जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर अमेरिका पुन्हा नव्या वाटेवर अग्रेसर झाल्याचे दिसत आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकांगीपणे अनेक वादग्रस्त निर्णय घेत जगाला धक्के देण्याचे काम केले होते. मात्र बायडेन यांनी यापासून फारकत घेत नवी वाट स्वीकारली आहे.
बायडेन यांची सहकार्याची भूमिका
'जगासोबतची आमची भागीदारी आम्ही पुन्हा दुरूस्त करू आणि केवळ कालच्याच नव्हे तर आजच्या आणि उद्याच्या आव्हानांवरही मात करू' असे आश्वासक उद्गार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर काढले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करण्यापूर्वीच बायडेन यांनी त्यांचा दृष्टीकोन देशासमोर ठेवला. त्यांची ही भूमिका अमेरिकेतील सर्व विभागांसाठी दिशादर्शक असणार आहे. आर्थिक सुरक्षा हीच राष्ट्रीय सुरक्षा असल्याच्या प्राथमिक भूमिकेवर बायडेन यांची दूरदृष्टी आधारीत आहे. ट्रम्प यांच्याप्रमाणे केवळ भावनिक आवाहने करण्यापेक्षा प्रत्यक्ष कृतीवर बायडेन यांचा भर आहे.
प्रत्यक्ष कृतीवर बायडेन यांचा भर
मूल्यांच्या संरक्षणाविषयी केवळ भाषणबाजी करण्यापेक्षा त्यांच्या संरक्षणासाठी प्रथम कृती करण्यावर बायडेन यांचा भर असल्याचे दिसत आहे. आधी चर्चा आणि सहकार्य हे धोरण ठरवितानाच लष्कराच्या अद्ययावतीकरणाकडेही अमेरिकेने भर दिला आहे. पारंपरिक मित्रांसोबतचे सहकार्य वाढविण्यासोबतच आंतरराष्ट्रीय मंचांवरील अमेरिकेचे स्थान पुन्हा बळकट करण्याकडे भर देणे यातूनच अमेरिकेच्या नव्या भूमिकेचा आता अंदाज लावला जाऊ शकतो.
ट्रम्प यांची हेकेखोर भूमिका
उत्तर कोरियासोबचा तणाव, कोरोना संकटाचा मुकाबला करणे, इराणसोबतच्या करारातून बाहेर पडणे, पॅरीस कारारातून माघार असे अनेक एकांगी निर्णय ट्रम्प यांनी घेतले होते. याशिवाय द्वेषमूलक राजकारणाला ट्रम्प यांच्या कार्यकाळात प्रोत्साहन मिळाल्याने अमेरिकेच्या सामाजिक संरचनेलाही मोठा धक्का बसला. मात्र बायडेन ही विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यावर भर देत आहेत. स्वातंत्र्य, शांतता, समृद्धी, वैयक्तिक आदर यासाठी लोकशाही महत्वाची असल्याची जाण असणारे बायडेन हे प्रगल्भपणे परिस्थिती हाताळत आहेत.
चीनकडून बायडेन यांच्या भूमिकेचे स्वागत
चीन सातत्याने आक्रमक होत आहे. चीन हा अमेरिकेचा एकमेव स्पर्धक असल्याचे बायडेन यांनी म्हटले आहे. मात्र खुल्या आंतरराष्ट्रीय प्रणालीसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठीची आर्थिक, राजकीय, लष्करी आणि तंत्रज्ञान क्षमता चीनमध्ये असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे. बायडेन यांच्या या भूमिकेचे चीननेही स्वागत केले आहे. चीनसोबतचा धोरणात्मक तणाव ओळखूनही चीनसोबतच्या सहकार्याविषयी बायडेन यांनी घेतलेल्या भूमिकेचे चीनचे अधिकृत वृत्तपत्र ग्लोबल टाईम्समधून स्वागत करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेची जागा घेण्याचा प्रयत्न चीनकडून सातत्याने केला जात आहे. मात्र लष्करी आणि आर्थिक ताकदीच्या जोरावर अमेरिका आजही महासत्तेच्या जागेवर कायम आहे.
सहकार्यातूनच आव्हानांचा सामना
केवळ अमेरिकाच नाही तर इतर कोणतेही राष्ट्र एकट्याने सर्व समस्या सोडवू शकत नसल्याचे बायडेन यांचे मत आहे. जागतिक महामारी, हवामान बदल, सायबर हल्ले, दहशतवाद आणि इतर हिंसक आव्हानांचा सामना एकत्रितपणे करण्याची गरज बायडेन ओळखून आहेत. पॅरीस करारात पुन्हा सहभागी होऊन बायडेन यांनी सकारात्मक संदेश दिला आहे. आंतरराष्ट्रीय मंचांवरील सहकार्य वाढवून एकमेकांच्या हातात हात घेऊनच आव्हानांचा सामना केला जाऊ शकतो असे त्यांचे मत आहे. लोकशाही देशांनी एकत्र येत मजबूत आंतरराष्ट्रीय कायदे केले तर चीनला जबाबदार धरले जाऊ शकते अशी ट्रम्प यांची भूमिका आहे.
भारताला महत्वाचे तंत्रज्ञान देण्याची गरज
भारतासोबतचे मैत्रीपूर्ण संबंध वृद्धींगत करण्यावरही त्यांचा भर आहे. 2020 मध्ये भारत आणि अमेरिका जगातील सर्वात जवळचे मित्र असतील असे बायडेन 2006 मध्ये म्हणाले होते. भारत-अमेरिकेच्या सहकार्याशिवाय कोणत्याही आंतरराष्ट्रीय आव्हानाचा सामना केला जाऊ शकत नाही असेही ते म्हणाले होते. बायडेन यांनी त्यांच्या प्रशासनातही 50 हून अधिक भारतवंशीयांची नियुक्ती केलेली आहे. दोन्ही देशांतील संबंध आणखीन वृद्धींगत करण्यासाठी अजूनही अनेक बाबी त्यांना करायच्या आहेत. इंडो-पॅसिफिक भागात चीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी महत्वाचे तंत्रज्ञान भारताला देण्यासाठी बायडेन यांनी पुढाकार आता घेण्याची गरज आहे. महासत्तेसोबतचे सहकार्य जागतिक शांतता आणि समृद्धीच्या हिताचे असल्याचा विश्वास निर्माण करण्याच्या यशस्वीतेवरच बायडेन यांच्या कार्यकाळाचे मूल्यमापन इतिहासात केले जाईल.