नवी दिल्ली - शाओमीने स्मार्टफोनच्या ब्रँडमध्ये जगात पहिल्यांदाच जूनमध्ये सॅमसंग आणि अॅपलला मागे टाकले आहे. याबाबतची माहिती काउंटरपाँईट रिसर्च अहवालात देण्यात आली आहे.
महिना ते महिना असा विचार करता शाओमीच्या विक्रीत 26 टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे शाओमी हा जूनमध्ये सर्वात विक्री होणारा स्मार्टफोनचा ब्रँड ठरला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शाओमी हा जगभरात विक्री होण्यात दुसरा क्रमांकाचा ब्रँड ठरला होता. कंपनीने 2021 पासून जगभरात सुमारे 800 दशलक्ष स्मार्टफोनची विक्री केली आहे. ही माहिती काउंटरपाँईट रिसर्चने दिली आहे.
हेही वाचा-शरद पवारांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची बंगळुरूमध्ये घेतली भेट; 'या' विषयावर चर्चा
रेडमीच्या कामगिरीने शाओमीचा निम्न शहरांमध्ये विस्तार-
काउंटरपाँईट रिसर्चचे संचालक तरुण पाठक म्हणाले, की हुवाईच्या विक्रीत सुरुवातीपासून घट आहे. दुसरीकडे शाओमीच्या विक्रीत सातत्य राहिले आहे. शाओमी ही सर्वाधिक वेगाने वाढणारी मूळ उत्पादक कंपनी आहे. तिचा निम्न शहरांमध्ये विस्तार होत आहे. रेडमी 9, रेडमी नोट 9 आणि रेडमी के 9 सिरीजने चांगली कामगिरी केल्याचे विश्लेषक वरुण मिश्रा यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-गोगरामधून भारत-चीनचे सैनिक मागे फिरले, तात्पुरते बांधकामही उद्धवस्त
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शाओमीला मिळाली संधी
कोरोनाची दुसरी लाट आल्याने व्हिएतनामधील सॅमसंगचे उत्पादन जूनमध्ये विस्कळित झाले आहे. त्याचा सॅमसंगच्या डिव्हाईसच्या उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. शाओमी हा मजबूत, मध्यम श्रेणीत पोर्टफोलिओ असलेला, विस्तारित बाजारपेठेत जाणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंगच्या ए-श्रेणीमध्ये काही काळ दरी निर्माण झाली त्याचा शाओमीला फायदा झाला आहे.
हेही वाचा-कर्नाटकमध्ये आजपासून रात्री 8 ते सकाळी 10 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू