आंतरराष्ट्रीय शांतता दिनाची स्थापना 1981 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सर्वानुमते ठराव करून करण्यात आली. सर्व प्रकारचे मतभेद विसरून, जगातील सर्व लोकांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रांमधील आणि लोकांमधील सलोखा वाढवण्यासाठी, तसेच शांततेच्या आदर्शांमधील दृढता वाढविण्यासाठी हा दिवस समर्पित केला गेला आहे. दरवर्षी संयुक्त राष्ट्र संघटना ही लोकांना आणि राष्ट्रांना आपापली शस्त्रे खाली ठेऊन, सलोख्याने एकत्र राहण्याच्या जबाबदारीची आठवण करुन देतात.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय शांतता दिनाला एका विशिष्ट विषयाला हात घातला जातो आणि त्यामाध्यमातून वेगळा संदेश लोकांना दिला जातो. तो विषयच त्या-त्या वर्षीची, विश्वशांती दिवसाची थीम होते. यावर्षीच्या विश्वशांती दिवसाची थीम आहे, 'शांततेसाठी पर्यावरण संवर्धन'. (क्लायमेट अॅक्शन फॉर पीस)जागतिक हवामान संकट हे सुरक्षा आणि स्थिरतेसाठी धोका आहे. जागतिक तापमानवाढीमुळे किनारी भागात राहणाऱ्या लाखो लोकांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. सुरक्षेसाठी आणि चांगल्या राहणीमानासाठी देशांतर्गत भागातील लोकांवरही स्थलांतराची वेळ आली आहे. वाईट होत चाललेले हवामान, वादळांची वाढती संख्या आणि कमी होत चाललेले उर्जेचे नैसर्गिक स्त्रोत हे सर्व पाहता भविष्यात राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये हवामानाशी संबंधित विवाद वाढण्याची शक्यता आहे.जगभरातील साधारणपणे ९७१ दशलक्ष लोक धोकादायक हवामान असलेल्या भागात राहत आहेत. यांपैकी तब्बल ४०० दशलक्ष लोक हे अशा देशांमध्ये राहतात, जिथे शांततेचे प्रमाण आताच खूप कमी आहे. नैसर्गिक स्त्रोतांचे घटते प्रमाण आणि त्यावरून वाढणारा तणाव, ही जगातील सर्वच देशांसमोरील समस्या झाली आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा तुटवडा, पिण्यायोग्य पाण्याचे घटते साठे, जागतिक तापमानवाढ या समस्या कमी म्हणून की काय, तर लोकांसमोर राजकीय अस्थिरतेचीही समस्या ठाण मांडून आहे. जगभरातील अनेक मोठमोठ्या देशांमध्ये सरकारविरोधात आंदोलने होण्याचे प्रमाण वाढतच आहे.हवामानातील बदलांमुळे जवळपास सर्वच राष्ट्रांच्या सरकारांवर तणाव येतो आहे. जगाच्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय व्यवस्थांवर देखील त्यामुळे तणाव येतो आहे. आणि दुर्दैवाने जगातील मोठ्या राष्ट्रांपैकी कोणतेही राष्ट्र याविषयी काहीही करू शकत नाही, किंवा करण्यास उत्सुक नाही. 'पृथ्वीची फुफ्फुसे' मानले जाणाऱ्या अमेझॉन जंगलाला मागच्या महिन्यात मोठी आग लागली. ती आग नैसर्गीक होती की मानवनिर्मित यावर बरीच मतमतांतरे आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याऐवजी मोठ्या राष्ट्रांकडून आणि खुद्द ब्राझीलच्याच पंतप्रधानांकडून त्या दुर्घटनेचे राजकारण करण्यात आले.़विश्वशांती आणि पर्यावरणाचा काय संबंध? असा प्रश्न कोणाला पडण्याआधीच, काही तथ्ये जाणून घेणे गरजेचे आहे. २०१७ मध्ये जगभरात एकूण झालेल्या स्थलांतरापैकी ६१ टक्के स्थलांतर हे बदलत्या किंवा खराब हवामानामुळे झाले होते. तर युद्धामुळे झालेले स्थलांतर हे ३८ टक्के होते. त्यामुळे युद्धांपेक्षा हवामानातील होणारे बदल हे शांततेसाठी अधिक धोकादायक आहेत हे उघड आहेत. तसेच, सध्याच्या जागतिक राजकारणातील बरेचसे विषय हे पर्यावरण आणि हवामानाशीच संबंधित आहेत.युद्ध असो वा हवामानातील बदल, कारण काहीही असो मात्र, मागील दहा वर्षांमध्ये जागतिक शांततेची सरासरी पातळी ही ३.७८ टक्क्यांनी खाली घसरली आहे हे नक्की.फक्त युद्धांबाबत बोलायचे झाल्यास, पुढील काही भागांतील युद्धांमुळे विश्वशांतीला धोका निर्माण होतो आहे. यामध्ये - - सिरिया मधील युद्ध
- अफगाणिस्तान
- अमेरिका आणि चीनमधील तणाव
- सौदी अरेबिया
- पॅलेस्टाईन आणि इस्त्राईलमधील तणाव
- अमेरिका आणि इराण-इराक मधील तणाव
- भारत-पाकिस्तान तणाव
- मेक्सिकोमधील वाढती गुन्हेगारी
दुष्परिणाम -
युद्धांचे दुष्परिणाम काय आहेत हे विशेष सांगण्याची गरज नाही. जगाने दोन महायुद्धांचे परिणाम आपल्या डोळ्यांनी पाहिलेत आणि अनुभवलेत. मात्र तरीही, युद्ध थांबवण्यात आपण अयशस्वी होतो आहोत. जगातील मोठ्या देशांपैकी, अमेरिका आपल्या लष्करासाठी वर्षाला सहा हजार कोटी रुपये खर्च करते. त्याखालोखाल चीन, सौदी अरेबिया, भारत, फ्रान्स आणि रशिया हे अनुक्रमे दोन हजार कोटी, ६७५ कोटी, ६६५ कोटी, ६३८ कोटी आणि ६१३ कोटी रुपये खर्च करते.
ही सर्व रक्कम पर्यावरण संवर्धनासाठी आणि लोककल्याणासाठी वापरली गेली, तर पृथ्वीवरचे लोक स्वर्गात जाण्याऐवजी, पृथ्वीवरच दुसरा स्वर्ग तयार होईल. मात्र हे खूपच आदर्शवादी बोलणे झाले. तरीही, चांगली गोष्ट म्हणजे, जगातील ७२ देशांनी आपला लष्करी खर्च हा कमी केला आहे. यामध्ये युक्रेन, सुदान, इजिप्त आणि रवांडा यांसारख्या देशांचा समावेश होतो. स्वतःला महाशक्ती किंवा महासत्ता म्हणवून घेणाऱ्या देशांनी या लहान देशांकडून खरंच काहीतरी धडा घेण्याची गरज आहे.
भारतातील स्थिती..
केवळ भारतापुरते बोलायचे झाल्यास, दहशतवाद हा भारतातील शांततेला सर्वात मोठा धोका आहे. त्याखालोखाल नक्षलवाद आणि त्यानंतर धार्मिक संघटना. भारत-पाकिस्तान सीमा असो वा भारत-चीन, तिथला तणाव हा बऱ्याच काळापासून सुरु आहे. तो कमी व्हायची काहीच चिन्हे दिसत नसताना, भारतात गेल्या काही वर्षांपासून धार्मिक तणावदेखील वाढतो आहे. आणि दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तसे, भारतातील हवामानदेखील वाईट स्थितीमध्ये आहे. जागतीक तापमानवाढ, पिण्याच्या पाण्याची कमतरता हे सर्व आहेच, मात्र यासोबतच काही भागांमध्ये महापूर, तर काही भागांमध्ये दुष्काळ अशा परिस्थितीमध्ये भारत सध्या अडकला आहे.
या सर्वावर उपाय काय?पहिली पायरी म्हणजे हवामान बदल होतो आहे, जागतिक तापमानवाढ होते आहे हे मान्य करणे. जगभरातील मोठे नेते ही गोष्ट मान्यच करायला तयार नाहीयेत. कोणी बर्फाच्या पाण्याने अंघोळ करत, पॅरिस कराराला नकार देतो आहे; कोणी तापमानवाढीबद्दल प्रश्न विचारल्यास, "आजकालच्या लोकांची सहनशक्ती कमी होते आहे" असा युक्तीवाद करत आहे; तर कोणी "संपूर्ण जगाला ऑक्सिजन पुरवण्याचा आम्ही ठेका नाही घेतला" असे म्हणत अमेझॉनसाठीची मदत नाकारतो आहे. त्यामुळे जागतिक हवामानावर कृती करण्यासाठी आधी हे मान्य करणे आवश्यक आहे, की हवामान खराब होते आहे.त्यानंतर बाकीच्या उपायांमध्ये मग, जनजागृती करणे, अक्षय उर्जास्त्रोतांचा वापर आणि प्रचार वाढवला पाहिजे, जगभरातील विस्थापितांसाठी उपाययोजना आणि मदतकेंद्रे उभी केली गेली पाहिजेत; आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन केले गेले पाहिजे. तरच, जागतिक हवामान सुधारण्यास मदत होईल. ज्याने अर्थातच, लोकांच्या राहणीमानात सुधारणा होऊन विस्थापण कमी होईल आणि हळूहळू जागतिक शांततेमध्येदेखील वाढ होण्यास मदत होईल.