पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये दूध आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर 37 वर्षीय आरोपीने बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपीला निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलिसात तक्रार दिली आहे.
मोहन चिनप्पा कुऱ्हाडे वय-38 वर्ष रा. अजिंठा नगर, चिंचवड असे आरोपी चे नाव आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास घराच्या जवळच्या किराणा दुकानात दूध आणण्यासाठी जात होती. तेव्हा, दबा धरून बसलेला आरोपी मोहन याने पीडित अल्पवयीन मुलीला पडक्या शेडमध्ये ओढत नेले. तसेच तिच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग करत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, पीडित मुलगी आली तेव्हा ती अत्यंत घाबरलेली होती. तिने संबंधित घटना आईला सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला काही तासातच बेड्या ठोकण्यात आल्या असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक व्ही.व्ही. घाटे या करीत आहेत.