पंढरपूर- सांगोला तालुक्यातील नाझरे येथे सतत दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीची पत्नीने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर हत्येनंतर पतीचा मृतदेह घरातच पुरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येनंतर घरातच पुरला मृतदेह
नाझरे येथे आकाश शिंदे हा पत्नीसह आणि दोन मुलांसोबत राहत होता. आकाश भंगार गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र, सतत दारु पिऊन पत्नीला मारझोड करत असे. त्यामुळे घरात सतत वाद होत होते. त्यातूनच दहा ते बारा दिवसापूर्वी आकाश आणि कसाबाई याचे कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरार कासाबाईने आकाशला बेदम मारहण करत जखमी केले. यातच त्याचा मृत्यू झाला. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने कसाबाईंनी दोन्ही मुलांच्या मदतीने आकाशचा मृतदेह घरातच पुरला.
पुतण्यामुळे घटना उघडकीस
मात्र, आकाशच्या पुतण्याच्या जबावावरुन खुनाची घटना उघडकीस आली. त्यानंतर सांगोला पोलीस ठाण्यात कासाबाई आणि दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राजेश गवळी करत आहे.