पालघर - बोईसर पोलीस ठाण्यातील २ पोलीस उपनिरीक्षकांना 3 लाख रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. प्रशांत बाळासाहेब पासलकर (वय 32) व नजीब नजीर इनामदार (वय 38) अशी या दोन पोलीस उपनिरीक्षकांची नावे आहेत.
तक्रारदार यांच्यावर बोईसर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत पासलकर व नजीब इनामदार या दोघांनीही तक्रारदारकडे 3 लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबतची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची पडताळणी केली असता, बोईसर पोलीस ठाण्याच्या या दोघा पोलीस उपनिरीक्षकांनी तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.
तक्रारदारकडून 3 लाख रुपये (दीड लाख रुपये भारतीय चलनातील 2 हजार रुपये दराच्या 75 नोटा व उर्वरित लहान मुलांच्या खेळण्यातील 2 हजार रुपये दर्शनी मूल्याच्या 75 डमी नोटा)लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या दोघा पोलीस उपनिरीक्षकांना रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकातील पोलीस निरीक्षक सलील भोसले, घोलप, शिंदे, खाबडे, पवार जाधव, महाले यांनी ही कारवाई केली आहे.