ठाणे - पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला वारंवार फोन करून तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी अश्लील शिवीगाळ करणाऱ्या तिघांना ठाणे नगर पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री पोलीस मदत क्रमांक (100) तब्बल 50 वेळा संपर्क करून शिवीगाळ केली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी सांगितले.
मुकेश सक्सेना, गिरीश सक्सेना आणि आसू गौड अशी आरोपींची नावे असून गेल्या दोन महिन्यांपासून उल्हासनगर येथे भाड्याने राहत आहेत. तिघेही मजूरी करतात. त्यांनी रविवारी मध्यरात्री 12 ते 2 पर्यंत महिला कर्मचाऱयांना हैराण केल्यानंतर त्यांना पोलिसांनी धडा शिकवण्याचे काम केले.
रविवारी रात्री 11 च्या सुमारास ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील दूरध्वनी क्रमांकावर अज्ञात व्यक्तींनी फोन केला. नियत्रंण कक्षात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी फोन उचलून काय मदत हवीय? अशी विचारणा केली असता फोन करणाऱ्यांनी अश्लील बोलत शिवीगाळीला सुरवात केली. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम हाती आणि फोन डोंबिवली मानपाडा येथून येत असल्याचे ट्रेस झाले. अखेर आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. कलम 509, 507 आणि अश्लीलतेविरूदधचे कलम 354 ड व कलम 186 अन्वये आरोपींवर गुन्हे दाखल केले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांनी सांगीतले.