सातारा - स्थानिक गुन्हे शाखेने थरारक पाठलाग करून खुनातील संशयित आरोपीला जिल्ह्यातील आसगावातून जेरबंद केले आहे. या संशयित आरोपीचा कोरेगाव तालुक्यातील दरे गावाजवळील खुनाच्या घटनेत सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
कोरेगाव तालुक्यातील दरे गावचे हद्दीत माळावर राहण्यास असणाऱ्या पारधी वस्तीवर ५ जुलैला पूर्ववैमनस्यातून नऊ जणांनी विजय सावता काळे यांचा निर्घृण खून झाला होता. त्यापैकी दोन संशयितांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. मात्र, मुख्य संशयित व इतर साथीदार गुन्हा घडल्यापासून फरार झाले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गुन्हयातील मुख्य संशयित आसगाव परिसरात नातेवाईकांना भेटण्याकरिता येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस पथक आसगाव परिसरात लक्ष ठेवून होते. या पथकाला अपेक्षित संशयित आसगावच्या बाहेर टेकडीवर असलेल्या पारधी वस्तीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलीस हे पारधी वस्ती असलेल्या टेकडीवर चढून गेले.
पोलीसांची चाहूल लागताच संशयिताने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीसांनी थरारक पाठलाग करून त्याला जेरबंद केले. ही कारवाई सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, ज्योतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, मुबीन मुलाणी, शरद बेबले यांनी यशस्वी केली. या कारवाईत पोलीस कर्मचारी नितीन गोगावले, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, विक्रम पिसाळ, विशाल पवार, केतन शिंदे व विजय सावंत हे सहभागी झाले.