अहमदनगर - राहुरी तालुक्यातील तीन मंदिरांतील दानपेटी आणि सोन्याच्या अलंकारांवर चोरट्यांनी एकाच रात्री हात साफ केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. एका मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोर चोरी करताना कैद झाले आहेत.
तालुक्यातील उंबरे, ब्राम्हणी आणि मानोरीतील देवीच्या मंदिरात चोरी करून चोरट्यांनी दागिने व दानपेटीतील रोख रक्कम लंपास केली आहे. यामध्ये ब्राह्मणीचे ग्रामदैवत जगदंबा (मुक्ताई) मंदिरातून चोरट्यांनी चाळीस हजार रुपयांचे दागिने, उंबरे येथील मंदिरातून अर्धा तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपयांची चोरी केली आहे. याचबरोबर मानोरी रेणुका माता मंदिरातून सुमारे दहा हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी एकाच रात्री विविध मंदिरात केलेल्या या चोऱ्यांमुळे खळबळ उडाली आहे.
तालुक्यात चोरीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता भुरट्या चोरट्यांनी छोट्या मंदिरांमध्ये आपले हात साफ केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी या मंदिरांना भेट दिली. पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे आपली टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.