औरंगाबाद - पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतल्याने आणि वेळेवर मदत न मिळाल्याने अपघातात जखमी झालेल्या युवकाला आपले प्राण गमवावे लागले आहेत. डॉ. अतुल देशमुख असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो ४ दिवसांपूर्वीच शहरातील एमजीएम रुग्णालयात गावातील एका रुग्णाला मदत करण्यासाठी आला होता.
टिव्ही सेंटर-डीमार्ट रोडवर ही घटना घडली. अतुल गावाकडे परत जात असताना समोरून येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच त्याला धडक देणाऱ्या दुचाकीवरील ३ युवकही जखमी झाले. त्यातील एका युवकाला जबर मार लागल्याने सोबत असलेल्या युवकांनी त्याला तातडीने रिक्षातून रुग्णालयात नेले. मात्र, तिथेच रक्ताचा थारोळ्यात पडलेल्या अतुलला कोणीही रुग्णालयात नेण्यासाठी पुढे आले नाही. यावेळी घटनास्थळावर वाहतूक पोलीसही उपस्थित होते. त्यांनीही अतुलला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांनीही अपघातग्रस्ताला रुग्णालयात दाखल केले नाही. उलट या लोकांनी अपघातग्रस्ताचा व्हिडिओ तयार केला. त्यामुळे अतुलला वेळेवर उपचार मिळाले नाही आणि त्याचा मृत्यू झाला
काही वेळानंतर अतुलला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. २ दिवस उपचार घेतल्यानंतर अखेर त्याचा आज मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याच्या पालकांनी आज वाहतूक पोलिसांविरोधात तक्रार करण्याचे ठरवले आहे. जर त्या दिवशी वाहतूक पोलिसाने आपले कर्तव्य निष्ठेने बजावले असते, तर कदाचित आमचा मुलगा आज जिवंत असता, अशी भावना अतुलच्या कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.