ठाणे - उल्हासनगर मध्ये भरदिवसा रहदारीच्या रस्त्यावर एका 37 वर्षीय तरुणाची तीन जणांनी मिळून धारदार हत्याराने वार करून निर्घुणपणे हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 2 मधील आवतमल चौक, झुलेलाल मंदिरा रोड परिसरात झाली.
या प्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी त्रिकुटावर हत्येचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. ही हत्या निषाद गॅंगने केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. वशिष्ट यादव असे मृत तरुणाचे नाव असून तो आझाद नगर परिसरात राहत होता.
सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास मृतक यादव हा आवतमल चौक, झुलेलाल मंदिरासमोरून रोडवर पायी जात होता. यावेळी तीन जणांच्या टोळीने यादव याला भर रस्त्यात अडवून त्यांच्याकडील धारदार हत्याराने त्याच्या गळ्यावर शरीरावर सपासप वार करून त्याला जागीच ठार मारून घटनास्थळावरून पलायन केले. तरुणाची निघृणपणे हत्या झाल्याचे कळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, यादव याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून त्यादिशेने मारेकऱ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने आरोपींचे शोध कार्य सुरू केले आहे. याशिवाय ज्या ठिकाणी भरदिवसाही हत्याची घटना घडली, त्या ठिकाणावरील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
दरम्यान, उल्हासनगरात भरदिवसा तरुणाचा खून करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. मृतकाच्या नातेवाईकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, मात्र पोलिसाने त्या तक्रारी कडे दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या भावाची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. उल्हासनगर पोलीस ठाण्यात या खूनाच्या घटनेची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उल्हासनगर पोलीस करीत आहे.