ठाणे - भावाने घराच्या वादातून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मृताची पत्नीही हल्ल्यात रक्तबंबाळ झाली असताना पोलीस शिपाई सुनील धोंडे याच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले आहे. महेंद्र कर्डक असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मृत राजन कर्डक हे आरोपी महेंद्र कर्डकचे भाऊ होते. राजन आणि त्याची पत्नी वागले इस्टेट परिसरातील विजय सदन येथे राहात होते. राजन राहत असलेल्या घरावरून बुधवारी रात्री विकोपाला गेला होता. घरावरून दीर महेंद्र कर्डक आणि भावजय नीता कर्डक यांच्यात वाद सुरू होता. बुधवारी रात्री नीता यांनी घराचा दरवाजाच उघडला नाही. म्हणून रागाच्या भरात महेंद्र याने घराचा दरवाजा तोडला. घरात असलेल्या नीता कर्डक यांच्यावर धारदार चाकूने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
चित्रपटासारखा गुन्ह्याचा घडला थरारक प्रसंग
आरडाओरड एकूण पत्नीला वाचविण्यासाठी आलेल्या राजन कर्डक यांच्यावरही महेंद्र याने जीवघेणा हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले राजन यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमी नीताला संधी मिळताच त्यांनी इमारतीच्या बाहेर पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर पडलेल्या नीता यांनी श्रीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मुकुंद राठोड आणि पोलिस शिपाई सुनिल धोंडे यांना पाहताच त्यांच्याकडे धावून आली. जखमी नीता यांना पाहून पोलिसांनी ओढणीच्या सहाय्याने गळा बांधून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले.
आरोपीकडून गुन्हा कबूल-
पोलिसांनी आरोपी महेंद्र कर्डक याला अटक केली. त्याने चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. महेंद्र कर्डक याच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास श्रीनगर पोलीस करीत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सांगितले.
मदत केल्याने पोलील कर्मचाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव-
नीता कर्डक यांना प्रथम रुग्णालयात दाखल करून जीव वाचविणाऱ्या पोलीस शिपाई सुनील धोंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पोलिस शिपाई धोंडे यांना कौतुकाची थाप दिली आहे.