हिंगोली - अवैध दारू विरोधात पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या जात आहेत. मात्र, वगरवाडी येथे चहाच्या टपरीवर अनेक दिवसांपासून बिनधास्त अवैध देशी दारूची विक्री केली जात आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अजून किती जणांचा संसार उघड्यावर आणणार, असा सवाल गावातील महिलांकडून उपस्थित केला जात आहे.
वगरवाडी येथे चहाच्या टपरीवर अनेक दिवसांपासून अवैध देशी दारूची विक्री केली जात आहे. सुरूवातीला याची कोणालाही कल्पना आली नाही. मात्र रोजच वगरवाडीतील तळीराम चहाच्या टपरी जात असल्यामुळे गावातील महिलांना शंका आली आणि हा प्रकार उघडकीस आला.
चहा टपरीवरच अगदी सहजरित्या दारू मिळत असल्याने, दारू पिणाऱ्याच्या संख्येत वाढ होत चालली होती. शिवाय अल्पवयीन मुलावरही याचा विपरीत परिणाम होत होता. त्यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी हट्टा पोलिसांना महिलांच्या वतीने अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रार देण्यात आली. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे महिलांनी चहावाल्याला अनेकदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र तो देखील महिलांना अरेरावीची भाषा वापरत, 'तुमच्याने जे काही होते ते करा' अशा धमक्या देत होता. अखेर महिलांनी एकत्र येत बुधवारी टपरीमध्ये घुसून देशी दारूच्या बाटल्या बाहेर काढत टपरीसमोर फोडून संताप व्यक्त केला. महिलांचे तांडव पाहून जवळा बाजार चौकीच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत. दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
निलाबाई कोळी, पारूबाई कच्छवे, कमलाबाई रावळे, तुळसाबाई सोळंके, रेणुकाबाई कोळी, कलाबाई पवार, द्वारकाबाई कदम, अनुसया कदम, रेखा चोरघडे, उषा कदम, पार्वती कोळी, मीरा बोबडे, कलावती कदम, सखुबाई गिरी, तुळसाबाई पवार, गिरजाबाई चोरघडे, जानकाबाई राठोड. सुनिता सोनुणे, कमलाबाई पवार आणि कांताबाई देवरे या महिलांनी दुकानातील दारुच्या बाटल्या बाहेर काढल्या होत्या. महिलांनी एवढे रौद्ररूप धारण करून पोलिसांना दारू पकडून दिली. मात्र, पोलीस यावर कोणती कारवाई करतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.