नागपूर - शहरातील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयहिंद नगर येथे एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाली आहे.संपत्तीच्या हव्यासापोटी सख्खा भाऊच पक्का वैरी बनत भावाची हत्या केली आहे. अमीन अली वल्द सय्यद, असे मृत व्यक्तीचे नाव असून असिफ अली वल्द सय्यद, असे खूनी सख्ख्या भावाचे नाव आहे. याप्रकरणी असिफसह त्याच्या तीन मेहुण्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दिलेली अधिक माहिती अशी, अमीन अली आणि त्याचा भाऊ असिफ अली यांच्यात वडिलोपार्जित संपत्तीवरुन गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू होता. सोमवारी (10ऑगस्ट) रात्री पुन्हा याच विषयावरून दोन्ही भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी लहान भाऊ असिफ अली व त्याच्या महुण्यांनी अमीन अली यांना मारहाण करायला सुरुवात केली. अचानक झालेल्या मारहाणीमुळे अमीन अली पळत असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांचा खून केला आहे. ही घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी बघितली आहे. शिवाय संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यावरुन पोलिसांनी आरोपी आसिफ अली व त्याच्या मेहुण्यांना अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथून अटक केली आहे.