पिंपरी-चिंचवड (पुणे) - पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गालगत एका 26 वर्षीय महिलेवर कोयत्याचा धाक दाखवून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मंगळवारी (दि. 4 ऑगस्ट) पीडित महिला कामावरून घरी जात असताना कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला आहे. शिवाय तिला बेदम मारहाण देखील करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 26 वर्षीय महिला ही एका उच्चभ्रू वसाहतीमध्ये काम करते. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास चालत घरी जात असताना कोयत्याचा धाक दाखवून महिलेवर पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गा लगत बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून तळेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, पीडित महिलेला नराधमने बेदम मारहाण केली असून शिवीगाळ केल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे. पीडित महिलेने स्वतः पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले होते. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटने प्रकरणी अज्ञात 30 ते 40 वर्षीय अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक गावडे या करत आहेत.