बीजिंग : अमेरिकेने त्यांच्या हवाई हद्दीत उडणार चीनचा संशयास्पद बलून पाडल्यानंतर चीनने आता तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. शनिवारी अमेरिकेच्या लष्करी लढाऊ विमानाने संशयित चिनी बलून पाडल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे वक्तव्य आले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकेने ही घटना शांततेने आणि संयमाने हाताळण्याची गरज आहे. अमेरिकेत दिसलेला बलून हे चीनचे नागरी एअरशीप होते जे नियोजित मार्गापासून भटकले होते.
जमिनीवर नुकसान न करता पाडले : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन म्हणाले की, चीनचा हेरगिरी करणारा बलून यशस्वीपणे पाडण्यात आला आहे. मेरीलँडमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, 'पेंटागॉनने लवकरात लवकर बलून शूट करण्याचे आदेश दिले होते. बुधवारी जेव्हा मला बलूनबद्दल माहिती देण्यात आली तेव्हा मी पेंटागॉनला तो शक्य तितक्या लवकर खाली पाडण्याचे आदेश दिले. त्यांनी जमिनीवर कोणाचेही नुकसान न करता त्याला यशस्वीरीत्या पाडले. आम्ही थोड्या वेळाने याबद्दल अधिक अहवाल देऊ'.
कॅनडाचे सहकार्य : अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी शनिवारी एका निवेदनात सांगितले की, 'राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या निर्देशानुसार यूएस नॉर्दर्न कमांडला नियुक्त केलेल्या यूएस लढाऊ विमानाने चीन द्वारे प्रक्षेपित केलेला बलून दक्षिण कॅरोलिनाच्या किनारपट्टीवरील पाण्यावर यशस्वीरित्या पाडला'. ते पुढे म्हणाले, 'चीनचा हा बलून युनायटेड स्टेट्समधील मोक्याच्या ठिकाणांचे निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात होता. ही कारवाई कॅनडा सरकारच्या समन्वयाने आणि पूर्ण सहकार्याने करण्यात आली. उत्तर अमेरिकेतून मार्गक्रमण करत आलेल्या बलूनचे ट्रॅकिंग आणि विश्लेषण करण्यासाठी कॅनडाच्या योगदानाबद्दल आम्ही आभारी आहोत'. हा बलून उत्तर-पश्चिम कॅनडामार्गे अमेरिकेच्या मोंटानात पोहोचला होता.
अँटोनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द : अमेरिकेच्या आकाशात दिसलेल्या चिनी बलूनमुळे अमेरिका आणि चीनमधील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. गुरुवारी अमेरिकेच्या मोंटानात एक संशयास्पद चिनी बलून दिसला होता. अमेरिकेनंतर लॅटिन अमेरिकेतही एक चिनी बलून उडताना दिसला. यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी आपला चीनचा नियोजीत दौरा रद्द केला. अँटनी ब्लिंकन 2 व 3 फेब्रुवारील चीनच्या दौऱ्यावर जाणार होते. या भेटीत अँटोनी ब्लिंकन चीनच्या अधिकाऱ्यांशी रशिया आणि युक्रेन युद्धावर चर्चा करणार होते.
हेही वाचा : Antony Blinken China Visit : चिनी बलूनवरून तणाव वाढला, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा चीन दौरा रद्द