वॉशिंग्टन : अमेरिकेने सोमवारी दक्षिण कॅरोलिनाच्या किनाऱ्याजवळ अटलांटिक महासागरात पाडलेल्या चिनी बलूनचा मलबा चीनला परत करण्याची शक्यता नाकारली आहे. अमेरिकेच्या सैन्याने गेल्या आठवड्यात मोंटानाच्या आकाशावर तरंगत असलेल्या चिनी बलूनला लढाऊ विमानाच्या सहाय्याने पाडले होते. व्हाईट हाऊसने सोमवारी सांगितले की, हा एक पाळत ठेवणारा बलून होता. या बलूनमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि सार्वभौमत्वाचे उल्लंघन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बलून स्वयंचलित : या बलूनचा मलबा परत करण्याचा आमचा कोणताही विचार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले. अमेरिकन सैन्याने समुद्राच्या पृष्ठभागावर काही अवशेष मिळवले आहेत. किर्बी म्हणाले की त्यांनी बलूनबद्दल पुरेशी माहिती गोळा केली आहे. त्यांनी पत्रकारांना सांगितले की, हा बलून नुसता तरंगत जात नव्हता तर त्याच्याकडे प्रोपेलर आणि स्टीयरिंग देखील होते. या बलूनकडे स्वतःहून वेग वाढवण्याची, मंद करण्याची आणि वळण्याची क्षमता होती. बलूनकडे दिशा बदलण्यासाठी एक रडार देखील होता.
'चीनची कृती बेजबाबदार' : नॉर्दर्न कमांडचे कमांडर जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांच्या म्हणण्यानुसार, या बलूनची उंची 200 फुटांपर्यंत होती. त्यात अनेक हजार पौंड वजनाचा पेलोड होता, जो प्रादेशिक जेट विमानाच्या आकाराएवढा होता. आमचा विश्वास आहे की चीनची ही बेजबाबदार कृती संपूर्ण जगाने पाहिली असेल, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियर यांनी पत्रकारांना सांगितले. हा बलून अमेरिकेच्या आकाशात तरंगताना दिसल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी त्यांचा चीन दौरा पुढे ढकलला आहे.
बलून कॅनडामार्गे मोंटानात: पेंटागॉनचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल पॅट रायडर यांनी सांगितले की, हा बलून काही दिवसांपूर्वी चीनमधून अलास्काजवळील अलेउटियन बेटांवर आला होता. येथून तो उत्तर-पश्चिम कॅनडामार्गे मोंटानात पोहोचला. या बलूनचा जमिनीवर असलेल्या लोकांना लष्करी किंवा भौतिक धोका नव्हता. पेंटागॉनच्या अहवालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने पुष्टी केली की, हा बलून एक चिनी नागरी एअरशिप होता जो त्याच्या नियोजित मार्गापासून भटकला होता. हे एयरशीप मुख्यतः हवामानविषयक संशोधनासाठी वापरले जाते. कोणत्याही सार्वभौम देशाच्या भूभागाचे किंवा हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.