नवी दिल्ली Vivek Ramaswamy : भारतीय वंशाचे अमेरिकन व्यापारी विवेक रामास्वामी पुढील वर्षी २०२४ मध्ये होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीत उमेदवार आहेत. दरम्यान, त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोमवारी (११ डिसेंबर) आयोजित निवडणूक कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबाबत खुलासा केला. विवेक रामास्वामी यांना न्यू हॅम्पशायरमधील एका व्यक्तीनं जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश पाठवला.
एका व्यक्तीला अटक : या प्रकरणी एफबीआयनं ३० वर्षीय टायलर अँडरसनला शनिवारी (९ डिसेंबर) अटक केली. त्याच्यावर विवेक रामास्वामी यांना जीवे मारण्याच्या धमक्या पाठवल्याचा आरोप आहे. आरोपीच्या वकिलानं मात्र यावर काहीही बोलण्यास नकार दिला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांच्या प्रवक्त्यानं सोमवारी सांगितलं की, त्यांचा निवडणूक प्रचार आधीच ठरलेला होता. हे प्रकरण योग्यरितीनं हाताळल्याबद्दल आम्ही लॉ इनफोर्समेंटचे आभारी असल्याचं ते म्हणाले.
दोन धमकीचे मेसेज आले : एफबीआय एजंटनं न्यायालयाला सांगितलं की, निवडणूक प्रचार कर्मचार्यांना दोन धमकीचे संदेश मिळाले. एका संदेशात, रामास्वामी यांच्या डोक्यात गोळी मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर दुसऱ्या संदेशात कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांना ठार मारण्याची धमकी होती. एफबीआयनं सांगितलं की, सेलफोन नंबर टायलर अँडरसनचा होता. एफबीआयनं शनिवारी त्याच्या घराची झडती घेतली आणि त्याला अटक केली.
कोण आहेत विवेक रामास्वामी : ३७ वर्षीय विवेक रामास्वामी पेशाने व्यावसायिक आहेत. ते अमेरिकेतील आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं कुटुंब मूळचं केरळचं असून, त्यांचा जन्म अमेरिकेतील सिनसिनाटी येथे झाला. विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेतील अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. अमेरिकेतील स्थलांतरितांमध्ये ते विशेष लोकप्रिय आहेत. डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष असताना त्यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला होता.
हे वाचलंत का :
- Vivek Ramaswamy News : ..तर आणखी एक भारतीय वंशाची व्यक्ती होणार अमेरिकेचा उपाध्यक्ष, कसं ते जाणून घ्या
- US President Race : भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींची लोकप्रियता वाढली, ट्रम्प यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय उमेदवार ठरले
- US President Race : अमेरिकेत भारतीयांचा दबदबा, अध्यक्षपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा तिसरा उमेदवार उतरला