वॉशिंग्टन - येत्या चार वर्षात अमेरिका औषधांसाठी चीन आणि इतर देशांवर असलेले अवलंबित्व संपुष्टात आणणार आहे, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. यावेळी त्यांनी चीनने कोरोनाविषाणू पसरवल्याबद्दल अमेरिका आणि जगाला भरपाई द्यावी, अशी मागणी केली.
ओहिओ येथील कर्मचाऱ्यांना संबोधित केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी बराक ओबामा यांच्या विषयक धोरणावर टीका केली. पुढील चार वर्षात अमेरिका औषधनिर्माण आणि त्याची वितरण साखळी निर्माण करेल. त्यामुळे अमेरिकेला चीनवर किंवा इतर देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही, असे ट्रम्प म्हणाले. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती सुरू होईल आणि आणि अनेक कंपन्या अमेरिकेत माघारी येतील, असेही त्यांनी सांगितले.
अमेरिकेच्या पुढील वाटचालीबद्दल बोलताना ट्रम्प यांनी सहा आश्वासने दिली. कोरोनावर विजय मिळवणे, लॉकडाऊन संदर्भात निर्णय घेण्यासाठी माहिती आधारित दृष्टिकोन ठेवून निर्णय घेणे, संरक्षण साहित्य निर्मितीमध्ये वाढ करणे, अमेरिकेत अत्यावश्यक औषधांची खरेदी करण्याची वेळ आल्यास सरकारी यंत्रणांनी अमेरिकेत निर्माण झालेल्या औषधांची खरेदी करावी, अशा सूचना देणारा आदेश मंजूर केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. अमेरिकन कामगारांसाठी नोकऱ्यांचे पुनर्निर्माण करणे, त्यासाठी कंपन्यांना सवलती देणे, अनेक प्रकारचे कर शुल्क रद्द करून नवीन व्यापार विषयक धोरण राबवणे, या मुद्द्यांवर काम करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
"मी सर्व अमेरिकन नागरिकांसाठी लढत राहील, मी तुमचा आवाज आहे, मी तुमच्या नोकऱ्यांची संरक्षण करेन, परकीय व्यापार नियमांमध्ये हेराफेरी करणारे आणि त्याचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात राहीन, कोरोना महामारीच्या काळात अमेरिकेने अत्यावश्यक साधने वस्तू औषधे यांची निर्मिती करून पुरवठा करणे महत्त्वाचे आहे", असेही त्यांनी म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अनेक देशांचे नेते चीनकडून कोरोना विषाणूबाबत पारदर्शकता दाखवण्यात आली नाही. यामुळे जगातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आणि आर्थिक नुकसान झाले, असेही म्हटले जाते. मात्र, अमेरिका त्यांच्या देशात कोरोना विषाणूचा झालेला प्रसार याकडे दुर्लक्ष करून लोकांचे लक्ष दुसऱ्या मुद्द्यांकडे वळवण्यासाठी असे मुद्दे अमेरिकन नेते मांडत आहेत, असे चीनने म्हटले. अमेरिकेने कोरोना विषाणू चीनमधील वुहान विषाणू प्रयोगशाळेत तयार केल्याचा दावा केला होता.