कराची : पाकिस्तानच्या सुप्रसिद्ध स्नूकर खेळाडूने नैराश्यातून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. माजीद अली असे या खेळाडूचे असून गेल्या काही दिवसांपासून माजीद नैराश्याने ग्रस्त असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. माजीदने लाकूड कापण्याच्या मशीनने फैसलाबाद जवळील समुंद्री या गावात आपले जीवन संपवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. माजीद अलीने आशियाई अंडर 21 स्पर्धेत रौप्यपदक मिळवले होते.
नैराश्यातून घेतला टोकाचा निर्णय : प्रसिद्ध पाकिस्तानी स्नूकर खेळाडू माजीद अलीने आशियाई अंडर-21 रौप्यपदक पटकावले होते. माजीद अली हा गेल्या अनेक दिवसापासून नैराश्याचा सामना करत होता. माजीद अलीने गुरुवारी पंजाबमधील फैसलाबादजवळील त्याच्या मूळ गावी समुंद्री येथे आत्महत्या केली. माजीदने लाकूड तोडण्याचे यंत्र वापरून आपले जीवन संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माजीद अली अव्वल दर्जाचा खेळाडू : माजीद अलीने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. तो राष्ट्रीय सर्किटमध्ये अव्वल दर्जाचा खेळाडू होता. एका महिन्यात मृत्यू होणारा माजिद हा दुसरा स्नूकर खेळाडू आहे. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय स्नूकर खेळाडू मुहम्मद बिलाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
माजिदच्या मृत्यूमुळे कुटूंबाला हादरा : माजीद अली हा गुणी खेळाडू होता. मात्र माजिद त्याच्या किशोरवयापासूनच नैराश्याने ग्रस्त असल्याची माहिती त्याचा भाऊ उमरने दिली. अलीकडेच त्याला आणखी एक दुखाचा सामना करावा लागला. आमच्यासाठी ही भयानक गोष्ट आहे, कारण तो स्वत:चा जीव घेईल अशी आम्हाला अपेक्षा नसल्याचे उमरने यावेळी स्पष्ट केले. तर पाकिस्तान बिलियर्ड्स आणि स्नूकरचे अध्यक्ष आलमगीर शेख यांनी माजिदच्या मृत्यूमुळे संपूर्ण समुदाय दु:खी झाल्याचे नमूद केले आहे.
माजीदला कोणतीही आर्थिक समस्या नव्हती : माजीदकडे खूप प्रतिभा होती आणि तो तरुण असल्याने आम्ही त्याच्याकडून पाकिस्तानला गौरव मिळवून देण्याची अपेक्षा केली होती. मात्र माजीद अली याला कोणतीही आर्थिक समस्या नसल्याचेही आलमगीर शेख यांनी यावेळी स्पष्ट केले. मुहम्मद युसूफ आणि मुहम्मद आसिफ यांच्यासारख्या स्टार्सनी जागतिक आणि आशियाई चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावण्यास मदत केली. त्यामुळेच स्नूकर हा देशातील एक प्रतिष्ठीत खेळ बनल्याचेही आलमगीर शेख यांनी यावेळी सांगितले आहे.