इस्लामाबाद : पाकिस्तानात छुप्या पद्धतीने भारतीय टीव्ही मालिका दाखवल्या जात आहेत. त्यावर सहसा तेथील नियामक लक्ष देत नव्हते. मात्र आता पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामकाने बेकायदेशीर भारतीय चॅनेल प्रसारित करणार्या केबल टीव्ही ऑपरेटर्सविरोधात कारवाई सुरू केली आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने केबल टीव्ही ऑपरेटरना बेकायदेशीर किंवा प्राधिकरणाने प्रतिबंधित घोषित केलेल्या भारतीय सामग्रीचे प्रसारण ताबडतोब थांबवण्याचा इशारा दिला आहे. याबाबतचे वृत्त तेथील डॉन या माध्यमाने दिले आहे.
फक्त ठरविक कार्यक्रम दाखवता येणार - पाकिस्तानी नियमकाने (PEMRA) परवानाधारक वगळता इतर कोणत्याही चॅनेलला केबल टीव्ही नेटवर्कवर वितरणासाठी परवानगी दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. प्राधिकरणाने सांगितले आहे की, नियमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास प्राधिकरणाच्या कायद्यांनुसार त्यावर कारवाई करण्यात येईल. गुरुवारी, पेमराने सांगितले की त्यांच्या प्रादेशिक कार्यालयांनी बेकायदेशीर भारतीय चॅनेल प्रसारित करणार्या केबल ऑपरेटरच्या उल्लंघनाच्या अहवालावर अंमलबजावणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे.
काही केबल ऑपरेटर आणि टीव्ही चॅनेल हे सर्वोच्च न्यायालयाने तसेच पेमरा यांनी जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबतचे वृत्त डॉनने दिले आहे. याची कराची प्रादेशिक कार्यालयाने विविध भागात अचानक तपासणी केली आणि डिजिटल केबल नेटवर्क, होम मीडिया कम्युनिकेशन्स (प्रा.) लिमिटेड, शाहजेब या केबल ऑपरेटरवर छापे टाकले. केबल नेटवर्क आणि स्काय केबल व्हिजन यावरही छापे टाकले तसेच तपासणी करण्यात आली.
पाकिस्तानातील हैदराबाद कार्यालयाने 23 केबल ऑपरेटरवर छापे टाकले आणि अवैध भारतीय सामग्री प्रसारित करणारे आठ नेटवर्कचे कार्यालय जप्त करुन सील करण्यात आले. सुक्कूरमध्ये, अचानक छापा टाकण्यात आला ज्यामध्ये मीडिया प्लस लारकाना आणि युनिव्हर्सल सीटीव्ही नेटवर्क लारकाना बेकायदेशीर सामग्री प्रसारित करत असल्याचे आढळले. मुलतान कार्यालयाने बहावलनगर शहरात आणि केबल ऑपरेटर्सवर छापे टाकले. सिटी डिजिटल केबल नेटवर्क, स्टेट केबल नेटवर्क, नसीब आणि जमील केबल नेटवर्क, वर्ल्ड ब्राइट केबल नेटवर्क, स्टार इन्फॉर्मेशन कंपनी आणि ग्लोबल सिग्नल केबल नेटवर्क हे बेकायदेशीर सामग्री प्रसारित करत होते. छाप्यांदरम्यान, पेमराच्या अंमलबजावणी पथकांनी बेकायदेशीर उपकरणे जप्त केली आणि उल्लंघन करणाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.