सॅन जोस (कॅलिफोर्निया) : कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस शहरातील एका उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चोरीला गेला आहे. उत्तर अमेरिकेतील शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा होता. सॅन जोसच्या पार्क्स, रिक्रिएशन आणि नेबरहुड सर्व्हिसेसने याबद्दल ट्विट केले आहे.
अधिकारी चौकशी करत आहेत : त्यांनी ट्विट मध्ये म्हटले की, 'ग्वाडालुपे रिव्हर पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा गायब आहे. पुतळा कधी चोरला गेला हे अद्याप स्पष्ट नाही'. संपूर्ण उत्तर अमेरिकेत शिवाजी महाराजांचा हा एकमेव पुतळा आहे. पुतळा चोरीला गेल्यानंतर त्याला शोधण्यासाठी आम्ही समुदायाच्या नेत्यांसोबत काम करत असून याबद्दल आम्ही सतत अपडेट देत राहू, असे विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे. अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहे. त्यांनी लोकांकडून मदत मागितली आहे, असे विभागाने सांगितले.
सॅन जोस पुण्याचे 'सिस्टर शहर' : कॅलिफोर्नियातील सॅन जोस हे शहर पुण्याचे 'सिस्टर शहर' म्हणून ओळखले जाते. या उपक्रमाअंतर्गत सॅम जोस शहराला हा पुतळा भेट म्हणून देण्यात आला होता. दोन्ही शहरांचा इतिहास समृद्ध आहे. दोन्हीही संबंधित देशांतील शिक्षणाची केंद्रे आहेत. सॅन जोस शहर हे पुण्याप्रमाणेच उच्च तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट विद्यापीठांसाठी देशभरात ओळखले जाते. पुण्यात 107 महाविद्यालये असून येथे वर्षाला 87,000 विद्यार्थी पदवीधर होतात.
अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विलंब : अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाच्या उभारणीला 28 फेब्रुवारी 2014 मध्ये मान्यता देण्यात आली होती. निविदा प्रक्रिया पूर्ण करून 28 जून 2018 मध्ये लार्सन आणि टुब्रो कंपनीबरोबर एक करार करण्यात आला. त्यानंतर 19 ऑगस्ट 2018 रोजी या संबंधी कार्यादेश देण्यात आला. करारानुसार 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत स्मारकाचे काम पूर्ण व्हायला हवे होते. मात्र त्यानंतर तीन जनहित याचिकांमुळे न्यायालयीन स्थगिती तसेच गेली दोन वर्षे असलेले कोरोनाचे संकट यामुळे स्मारकाचे काम रखडले. प्रकल्पाच्या कामकाजाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सुकाणू समिती, प्रकल्प संनियंत्रण व अंमलबजावणी समिती व कार्यकारी समिती अशा तीन समित्यांची पुनर्रचना करून त्यांच्या कार्यकक्षा ठरवण्यात आल्या आहेत. या प्रकल्पासाठी एल ऍण्ड टी कंपनीला एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी त्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोणताही वाढीव खर्च दिला जाणार नाही. करारानुसारच सर्व पैसे दिले जाणार आहेत.
हेही वाचा : Firecrackers During Diwali In US : आता अमेरिकेतील दिवाळीही धडाक्यात! या राज्यात दिवाळीच्या दिवशी फटाके फोडण्यास परवानगी