वेलिंग्टन (न्युझीलंड) : न्यूझीलंड सध्या गंभीर नैसर्गिक आपत्तीतून जात आहे. चक्रीवादळ गॅब्रिएलमुळे आलेला व्यापक पूर आणि भूस्खलनामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. ही परिस्थिती पाहता सरकारने मंगळवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. ही घोषणा सहा प्रदेशांना लागू होईल ज्यांनी आधीच स्थानिक स्तरावर आपत्कालीन स्थिती घोषित केली आहे.
या प्रदेशांत आणीबाणी : न्यूझीलंड सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार, नॉर्थलँड, ऑकलंड, तैराविती, बे ऑफ प्लेंटी, वायकाटो आणि हॉक्स बे या प्रदेशांत या आणीबाणीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या इतिहासात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री किरन मॅकअनल्टी यांनी स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.43 वाजता या घोषणेवर स्वाक्षरी केली. घोषणेवर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनावर पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स आणि विरोधी पक्षाच्या प्रवक्त्याचा सल्ला घेतला. दोघांनीही आणीबाणीच्या घोषणेचे समर्थन केले.
'आणीबाणीची स्थिती फायदेशीर ठरेल' : किरन मॅकअनल्टी म्हणाले, 'ही एक अभूतपूर्व नैसर्गिक घटना आहे जिचा उत्तर बेटावर मोठा परिणाम होत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते आणि पायाभूत सुविधांचे नुकसान होते आहे'. मॅकअनल्टी पुढे म्हणाले, 'आज आम्ही आणखी पाऊस आणि जोरदार वाऱ्याची अपेक्षा करत आहोत. रविवारपासून राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन एजन्सी (NEMA) बाधित भागातील स्थानिक नागरी संरक्षण आपत्कालीन व्यवस्थापन (CDEM) संघांशी संपर्कात आहे. राष्ट्रीय आपत्कालीन स्थिती घोषित करण्याच्या गरजेचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही हा संपर्क केला. दोघांच्या अभिप्रायाच्या आधारावर मला वाटते की, आणीबाणीचे निकष आता पूर्ण केले गेले आहेत आणि राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती फायदेशीर ठरेल. या घोषणेमुळे बाधित क्षेत्रांसाठी संसाधनांचे समन्वय साधणे शक्य होईल'. सरकार काही दिवसांपासून या क्षेत्रासाठी मदत आणि संसाधने वाढवत आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.
गेल्या महिन्यात न्युझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी आपण पंतप्रधान पद सोडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर ख्रिस हिपकिन्स हे न्युझीलंडचे पुढील पंतप्रधान बनले. न्यूझीलंडची 2023 ची सार्वत्रिक निवडणूक 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. साडेपाच वर्षे सत्तेत राहिल्यानंतर आर्डर्न यांनी अचानकच हा निर्णय घेतला होता. कोरोनाव्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात जॅसिंडा यांनी ज्या प्रकारे देशाची परिस्थिती हाताळली होती त्याचे संपूर्ण जगात कौतूक झाले होते.
हेही वाचा : Unidentified Object On US : अमेरिकेच्या आकाशात उडणाऱ्या संशयास्पद वस्तू भविष्यातील मोठ्या धोक्याचे संकेत