वेलिंग्टन (न्यूझीलंड) : न्यूझीलंडची राजधानी वेलिंग्टनजवळ बुधवारी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू लोअर हटच्या वायव्येस ७८ किमी अंतरावर होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजली गेली आहे. मात्र, या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन केंद्राने ट्विट केले की, 'उत्तर बेटावर भूकंपाचे धक्के मोठ्या प्रमाणावर जाणवले. नुकसान किंवा दुखापतीचे कोणतेही तात्काळ वृत्त नाही. त्सुनामीचा इशाराही देण्यात आलेला नाही.
भूस्खलन, पुराचा धोका वाढणार: लोअर हटच्या उत्तर बेटाच्या दक्षिणेकडील टोकावरील वेलिंग्टन या आठवड्यात चक्रीवादळाच्या परिणामापासून त्रस्त आहे. या चक्रीवादळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हे चक्रीवादळ दक्षिण पॅसिफिक देशातील सर्वात विनाशकारी हवामान घटना मानली जाते. मात्र, गॅब्रिएल चक्रीवादळ आता न्यूझीलंडच्या खूप पुढे सरकले आहे. मात्र येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भूस्खलन आणि पुराचा धोका आणखी वाढणार असल्याचेही मानले जात आहे.
कायमच होतात भूकंप: 50 लाख लोकसंख्येचा हा देश पृथ्वीच्या रिंग ऑफ फायरवर आहे, जिथे प्रशांत महासागराच्या आसपास भूकंपाची स्थिती कायम असते आणि येथे भूकंप सामान्य आहेत. 2011 मध्ये, दक्षिण बेटावरील क्राइस्टचर्चमध्ये झालेल्या भूकंपात 185 लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या होत्या. अनेक वेळेस या परिसरामध्ये भूकंप होत असतात. यावर्षीही या परिसरात भूकंप झाले आहेत.
रोमानियामध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंप: दक्षिण-पश्चिम रोमानियाच्या गोर्ज काउंटीमध्ये मंगळवारी दुपारी 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. वृत्तसंस्था शिन्हुआच्या वृत्तानुसार, 28 ऑक्टोबर 2018 पासून रोमानियामध्ये आलेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे मानले जात आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जवळपास त्याच डोंगराळ भागात ४० किमी खोलीवर होता जिथे एक दिवस आधी ५.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. देशाची राजधानी बुखारेस्टमध्ये भूकंपाचे धक्के स्पष्टपणे जाणवले. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी भूकंपाच्या केंद्राजवळील भागात भूकंपामुळे भौतिक नुकसान झाले आहे.
रोमानियात भूकंपाची मालिकाच: अलिकडच्या दिवसांमध्ये, रोमानियामध्ये भूकंपांचे एकामागोमाग एक धक्के बसता आहेत. त्यापैकी सहा सोमवारी आणि पाच मंगळवारी आले. रोमानिया संपूर्ण युरोपमधील सर्वात सक्रिय भूकंपीय प्रदेशांपैकी एक आहे. देशाने रिश्टर स्केलवर 7.0 ते 7.8 तीव्रतेसह अनेक मध्यवर्ती-खोली (70-200 किमी) भूकंपांची नोंद केली आहे.