मुंबई : पॅलेस्टाइनच्या हमास या संघटनेनं ७ ऑक्टोबरला सकाळी इस्रायलवर मिसाईल डागण्यास सुरुवात केली. हमासनं इस्रायलवर तब्बल ५००० रॉकेटचा मारा केल्याचं वृत्त आहे. प्रत्युत्तरात, इस्रायलनंही पॅलेस्टाइनविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या दोन्ही राष्ट्रांमधील संघर्ष तसा फार जुना आहे. या संघर्षाला धार्मिक रंग आहे. १९४८ मध्ये ज्यू लोकांनी या भूमीवर आपलं स्वातंत्र्य घोषित केलं आणि तेथील मुस्लिमांना गाझा पट्टीत पिटाळलं. तेव्हापासून या दोन समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. गेल्या काही वर्षात हा संघर्ष अधिक तीव्र झालाय.
- ऑगस्ट २००५ : मध्यपूर्वेतील युद्धात इजिप्तकडून गाझा ताब्यात घेतल्यानंतर इस्रायली सैन्यानं ३८ वर्षांनी गाझापट्टीतून माघार घेतली. त्यांनी येथील आपल्या वसाहती सोडल्या आणि त्याची जबाबदारी पॅलेस्टिनींना दिली.
- २५ जानेवारी २००६ : पॅलेस्टिनी निवडणुकीत हमासनं बहुसंख्य जागा जिंकल्या. मात्र हमासनं हिंसाचार सोडून इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिल्यामुळं इस्रायल आणि अमेरिकेनं पॅलेस्टिनींना देण्यात येणारी मदत बंद केली.
- २५ जून २००६ : हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायली सैन्यदलातील गिलाड शालित या अधिकाऱ्याला गाझामधून पकडलं. त्यानंतर इस्रायलनं गाझावर हवाई हल्ले आणि घुसखोरी सुरू केली. पाच वर्षांनंतर कैद्यांच्या बदल्यात शालितची सुटका झाली.
- १४ जून २००७ : हमासनं गृहयुद्धात गाझापट्टी ताब्यात घेतली. त्यांनी वेस्टबॅंकमधील पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या निष्ठावंत फताह सैन्याला हुसकावून लावलं.
- २७ डिसेंबर २००८ : पॅलेस्टिनींनी दक्षिण इस्रायली शहर स्टेरॉटवर रॉकेट डागल्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये युद्ध सुरू केलं. २२ दिवस हे युद्ध चाललं. युद्धविराम मान्य होण्यापूर्वी सुमारे १४०० पॅलेस्टिनी आणि १३ इस्रायली मारले गेल्याची नोंद आहे.
- १४ नोव्हेंबर २०१२ : इस्रायलनं हमासचे लष्करी प्रमुख अहमद यांची हत्या केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून सुमारे आठ दिवस रॉकेट आणि हवाई हल्ले सुरू होते.
- जुलै-ऑगस्ट २०१४ : हमासनं तीन इस्रायली किशोरवयीन मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. यानंतर पुन्हा युद्ध भडकलं. सात आठवड्यांच्या या युद्धात गाझामध्ये २१०० हून अधिक पॅलेस्टिनी आणि ७३ इस्रायली मारले गेले.
- मार्च २०१८ : गाझाच्या इस्रायल सीमेवर पॅलेस्टिनींची निदर्शनं सुरू झाली. त्यांना पिटाळून लावण्यासाठी इस्रायली सैन्यानं गोळीबार केला. या निदर्शनांमध्ये १७० हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाल्याची नोंद आहे.
- मे २०२१ : रमजान या मुस्लिमांच्या पवित्र महिन्यात इस्लामचे तिसरे पवित्र स्थळ जेरुसलेममधील अल अक्सा कंपाऊंडमध्ये इस्रायली सुरक्षा दलांशी झालेल्या संघर्षात शेकडो पॅलेस्टिनी जखमी झाले. अल अक्सामधून इस्रायली सैन्यानं माघार घ्यावी अशी मागणी करत हमासनं हल्ला सुरू केला. इस्रायलनं गाझावर हवाई हल्ले करत याला प्रत्युत्तर दिलं. सुमारे ११ दिवस हा संघर्ष चालला. या संघर्षात गाझामध्ये किमान २५० आणि इस्रायलमध्ये १३ लोक मारले गेले.
- ५ ऑगस्ट २०२२ : इस्रायलनं गाझामध्ये एका वरिष्ठ इस्लामिक जिहादी कमांडरसह किमान १० लोक मारले. याला प्रत्युत्तर म्हणून, इस्लामिक जिहादनं इस्रायलवर डझनभर रॉकेट डागली. हमास या संघर्षापासून दूर राहिला.
- ६ ऑगस्ट २०२२ : इस्रायलनं गाझावर आणखी हवाई हल्ले केले. तर इस्लामिक जिहादनं शेकडो रॉकेट डागून त्याला प्रत्युत्तर दिलं. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गाझामधील मृतांची संख्या २४ वर पोहोचली.
- ७ ऑगस्ट २०२२ : गाझा वरून डागण्यात आलेले रॉकेट जेरुसलेमच्या पश्चिमेस पाच किलोमीटरपर्यंत पोहोचले. गाझामधील मृतांची संख्या ३० वर पोहोचली.
- जानेवारी २०२३ : गाझा अतिरेक्यांनी रॉकेट डागल्यानंतर इस्रायलनं हवाई हल्ले सुरू केले. यामध्ये जेनिनमध्ये १० पॅलेस्टिनी ठार झाल्यानंतर वेस्ट बँकमध्ये तणाव वाढला.
- २ फेब्रुवारी २०२३ : पॅलेस्टाईनमधून रॉकेट हल्ल्यानंतर इस्रायली सैन्यानं गाझामध्ये हवाई हल्ला करत प्रत्युत्तर दिलं. सिडरोट, इविम आणि नीर आममध्ये इस्रायली सैन्यानं हवाई संरक्षणाद्वारे रॉकेटचा मारा रोखला.
- मे २०२३ : तीव्र संघर्षानंतर १३ मे रोजी इस्रायल आणि गाझामध्ये युद्धविराम लागू झाला. या संघर्षात गाझा पट्टीतील किमान ३३ पॅलेस्टिनी आणि दोन इस्रायली लोकांचा मृत्यू झाला.
- २६ सप्टेंबर २०२३ : इस्रायलनं गाझामध्ये इरेझ क्रॉसिंग बंद केल्यानंतर पॅलेस्टिनी सीमेवर दररोज निदर्शनं सुरू आहेत. या निदर्शनांदरम्यान सैन्यावर गोळीबार झाल्यानंतर इस्रायलनं हमासच्या सैन्य चौकीवर हल्ला केला.
हेही वाचा :