वॉशिंग्टन डी. सी - कोरोना विषाणूच्या प्रसरारामुळे जगावर आरोग्य आणीबाणी आली असून तब्बल 180 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात 2 लाख 39 हजार 580 कोरोना रुग्ण आढळले असून 5 हजार 656 जणांचा मृत्यू झाला आहे.
अद्यावयत आकडेवारीनुसार आत्तापर्यंत जगभरात 1 कोटी 50 लाख 84 हजार 578 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 6 लाख 18 हजार 485 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे, 91 लाख 4 हजार 117 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.
चीनमधील वुहान प्रांतातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्याचा सर्वांत जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार अमेरिकेत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 40 लाख 28 हजार 569 ऐवढी असून 1 लाख 44 हजार 953 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेनंतर ब्राझिल दुसऱ्या क्रमाकांवर असून 21 लाख 66 हजार 532 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 81 हजार 597 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर भारत आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची एकूण 11 लाख 92 हजार 915 झाली आहे. तर भारतानंतर रशिया, दक्षिण अफ्रिका, पेरु आणि मॅक्सिकोमध्ये कोरोनाबाधित आढळले आहेत.
कोरोनासाठी जगभरात सध्या 145 हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यांपैकी केवळ 20 लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे. तर भारतामध्ये दोन लसींना मानवी प्रयोग करण्याची परवानगी मिळाली आहे.