लंडन - ब्रिटनच्या पंतप्रधान पदी नियुक्त झाल्यानंतर ऋषी सुनक यांनी पहिल्यांदाच देशाला उद्देशून भाषण केले. सरकारच्या अजेंड्याच्या केंद्रस्थानी आर्थिक अस्थिरता दूर करणे आणि देशाचा आत्मविश्वास पुन्हा बहाल करणे हे असेल. अर्थात यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील याचे सूतोवाचही सुनक यांनी पहिल्याच भाषणात केले. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना समर्थपणे करीन अशी ग्वाहीही त्यांनी दिली. माझ्या नेतृत्वाखालील सरकार पुढच्या पिढीला, तुमच्या मुलांना आणि नातवंडांना डोक्यावर कर्ज घेऊन सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
इंग्लंडच्या पंतप्रधान पदी नियुक्तीनंतर ऋषी सुनक यांनी निवर्तमानपंतप्रधान लिझ ट्रस यांचे आभार मानले. त्यांची देशाचा विकास व्हावा याबाबतची कळकळ महत्वाची होती असे ते म्हणाले. हे एक उदात्त उद्दिष्टातून त्यांची झालेली अस्वस्थता कौतुकास्पद होती. परंतु काही चुका झाल्या. त्या वाईट हेतूने झाल्या नाहीत हेही सुनक यांनी स्पष्ट केले. आपल्या देशाच्या उज्वल भविष्यासाठी राजकारणाच्या पलिकडे जाऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे सुनक यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या उत्कृष्ट परंपरांचे प्रतिनिधित्व करणारे सरकार तयार करण्यासाठी आपण सत्ता हाती घेतल्याचे सुनक यांनी सांगितले. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ब्रिटनचे नवे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मंगळवारी 10 डाऊनिंग स्ट्रीट येथे आपल्या पहिल्या भाषणात आर्थिक आणि राजकीय गोंधळात ब्रिटनचा विश्वास संपादन करण्याचे वचन दिले. सुनक म्हणाले की, त्यांच्या सरकारमध्ये प्रत्येक स्तरावर सचोटी, व्यावसायिकता आणि जबाबदारी असेल. ते म्हणाले की, देशाच्या भविष्यात नेतृत्व करण्यासाठी, राजकारणापेक्षा तुमच्या गरजा मांडण्यासाठी, माझ्या पक्षाच्या उत्कृष्ट परंपरेचे प्रतिनिधित्व करणारे माझे सरकार असेल. एकत्रितपणे आपण अविश्वसनीय गोष्टी साध्य करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुनक पुढे म्हणाले की, त्यांच्या आधीच्या नेत्यांनी केलेल्या काही चुका सुधारण्यासाठी त्यांची कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते आणि पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यासाठीचे काम लगेच सुरू होईल. माझे सरकार अशी अर्थव्यवस्था तयार करेल जी ब्रेक्झिटच्या संधींचा सर्वाधिक फायदा घेईल, असेही सुनक म्हणाले.
सुरुवातीलाच सुनक यांनी यूकेच्या गहन आर्थिक संकटावर प्रकाश टाकला. सुनक म्हणाले की, सध्या आपला देश गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. कोविडचा परिणाम अजूनही कायम आहे. त्यावरही मात करता येईल. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान म्हणाले की पंतप्रधान म्हणून जॉन्सन यांच्या अविश्वसनीय कामगिरीबद्दल मी त्यांचा नेहमीच आभारी राहीन. सुनक यांच्या नियुक्तीनंतर जॉन्सन यांनीही ट्विट केले की, ऋषी सुनक यांचे या ऐतिहासिक दिवशी अभिनंदन, आमच्या नवीन पंतप्रधानांना पूर्ण आणि मनापासून पाठिंबा देण्याचा हा प्रत्येक कंझर्वेटिव्हचा क्षण आहे.
सुनक पुढे म्हणाले की, 2019 मध्ये कंझर्व्हेटिव्ह पक्षाने मिळवलेला जनादेश ही एकट्या व्यक्तीची मालमत्ता नाही, तर तो एक जनादेश आहे जो आपल्या सर्वांचा आहे. त्यांनी एक मजबूत NHS, चांगल्या शाळा, सुरक्षित रस्ते, सीमांवर नियंत्रण, पर्यावरणाचे रक्षण, सशस्त्र दलांना समर्थन आणि त्यांचा स्तर वाढवण्याचे वचन दिले. बकिंगहॅम पॅलेसमध्ये राजा चार्ल्स तिसरा यांची भेट घेतल्यानंतर सुनक हे यूकेचे नवे पंतप्रधान झाले. ट्रस पदावरून पायउतार झाल्यामुळे सुरू झालेली टोरी नेतृत्व स्पर्धा जिंकल्यानंतर सात आठवड्यांत सुनक हे यूकेचे तिसरे नेते आहेत.