नवी दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे अत्यंत विश्वासू सहकारी परराष्ट्र मंत्री किन गँग जवळपास महिन्याभरापासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. आता त्यांच्याबद्दल विविध अफवांना पेव फुटले आहे. 25 जून रोजी रशियन, श्रीलंकन आणि व्हिएतनामी अधिकार्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांना शेवटचे पाहिले गेले होते. 57 वर्षीय किन गँग यांना डिसेंबरमध्ये परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
'आरोग्याच्या कारणास्तव' अनुपस्थित : किन गँग हे इंडोनेशियातील आसियान शिखर परिषदेसाठी बीजिंगच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार होते. मात्र परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, किन 'आरोग्याच्या कारणास्तव' तेथे उपस्थित राहणार नाहीत. त्यांनी इतर कोणताही तपशील दिलेला नाही. तसेच परराष्ट्र मंत्री आणि EU परराष्ट्र धोरण प्रमुख जोसेप बोरेल यांच्यातील चर्चा देखील चीनने पुढे ढकलली आहे. बीजिंगने याबाबतही कोणतेच स्पष्टीकरण दिलेले नाही.
एका महिन्यापासून बेपत्ता : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि फिलीपिन्सचे माजी राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते यांच्या भेटीदरम्यानही किन गँग गायब होते. त्यावेळीच विविध चर्चांना उधाण आले होते. तर जुलैच्या सुरुवातीला ट्रेझरी सेक्रेटरी जेनेट येलेन यांच्याशी चिनी अधिकार्यांच्या झालेल्या चर्चेला देखील ते उपस्थित राहिले नाहीत. ते जवळपास एका महिन्यापासून बेपत्ता आहेत. चीन मात्र याबाबत काहीही बोललेला नाही.
सोशल मीडिया साइट सेन्सॉर केली : किन यांच्या अनुपस्थितीची चर्चा चिनी सोशल मीडिया साइट वीबोवर सेन्सॉर केली गेली आहे. Weibo प्लॅटफॉर्मवर 'किन गँग कुठे आहेत? असे शोधल्यावर 'नो रिझल्ट' असा संदेश मिळत आहे. किन यांची अनुपस्थिती जागतिक राजकारणात देखील चर्चेचा विषय बनली आहे. चीनचा जगातला दर्जा आणि प्रभाव लक्षात घेता, त्यांचे परराष्ट्रमंत्री बराच काळ सार्वजनिकपणे दिसले नाहीत हे खरोखरच विचित्र आहे.
पत्रकारासोबत अफेअरची चर्चा : या वर्षाच्या सुरुवातीला, चिनी सोशल मीडियावर अफवा पसरल्या होत्या की, किन यांचे एका चिनी टेलिव्हिजन पत्रकाराशी विवाहबाह्य संबंध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पत्रकार फू झियाओटियनसोबत अफेअर असल्याच्या अफवा त्यांच्या अनुपस्थितीचे कारण असू शकतात. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने कार्यकर्त्यांना विवाहबाह्य संबंध ठेवण्यास अधिकृतपणे मनाई केली आहे.
शी जिनपिंगही अनेक दिवस दिसले नव्हते : चीनमध्ये ही पहिलीच वेळ नाही की एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल अशा प्रकारच्या चर्चा होत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग अनेक दिवस दिसले नव्हते. त्यादरम्यान चीनमधील अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यामध्ये रस्त्यावर रणगाडे दिसत होते. त्यावेळी चीनमध्ये सत्तापालट झाल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र त्यानंतर जिनपिंग देशाच्या राजकारणात आणखी शक्तिशाली नेते म्हणून उदयास आले.
हेही वाचा :
- Israel Protest News : हजारो इस्रायली नागरिकांचा बेंजामिन नेतन्याहू सरकारच्या न्यायिक विधेयकाला विरोध; अंतिम मतांपूर्वी तीव्र आंदोलन
- UPI In Sri Lanka : आता श्रीलंकेतही करता येणार UPI द्वारे पेमेंट, दोन देशांमध्ये झाला सामंजस्य करार
- Yogi Adityanath France Riots : 'योगींना फ्रान्समध्ये पाठवा, ते 24 तासांत..' ; फ्रान्समधील दंगलींवर जर्मन प्राध्यापकाचे ट्विट व्हायरल