टोरंटो (कॅनडा): कॅनडातील एका प्रख्यात हिंदू मंदिराच्या भिंतीवर खलिस्तानी अतिरेक्यांनी भारतविरोधी घोषणा रेखाटत मंदिराचे विद्रुपीकरण केले आहे. या घटनेचा येथील भारतीय मिशनने निषेध केला आहे. तसेच कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांवर त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. कॅनडातील राम मंदिरात घडलेल्या या गंभीर घटनेचा भारतानेही निषेध केला असून, कारवाईची मागणी केली आहे.
वाणिज्य दूतावासाने केले ट्विट: ताजी घटना 13 फेब्रुवारी रोजी मिसिसॉगा येथील राम मंदिरात घडली. घटनेची वेळ मात्र कळलेली नाही. मिसिसॉगा येथील राम मंदिरावर भारतविरोधी भित्तिचित्रे करून विद्रुपीकरण केल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. आम्ही कॅनडाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची चौकशी करण्याची आणि गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे, असे टोरोंटो येथील भारताच्या वाणिज्य दूतावासाने मंगळवारी ट्विट केले.
राम मंदिरातील घटनेमुळे व्यथित: ओंटारियो कॅनडाच्या मिसिसॉगा येथील श्री राम मंदिरात रात्री (१३ फेब्रुवारी) घोषणा लिहून विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न झाला. राममंदिरातील या घटनेमुळे आम्ही खूप व्यथित झालो आहोत आणि आम्ही या प्रकरणी योग्य कायद्याची अंमलबजावणी करणार्या प्राधिकरणासोबत काम करत आहोत, असे मंदिराच्या फेसबुक पेजवर म्हटले आहे. मंदिराच्या भिंतींवर खलिस्तान समर्थक घोषणा आणि भारतविरोधी भित्तिचित्रे रंगली आहेत.
यापूर्वीही झाली होती विटंबना: कॅनडातील हिंदू मंदिरात भारतविरोधी भित्तिचित्रे काढून विद्रूप करण्याची ही पहिलीच वेळ नाही. जानेवारीमध्ये, ब्रॅम्प्टन कॅनडातील एका हिंदू मंदिरात भारताच्या विरोधात द्वेषाने भरलेले संदेश टाकत विटंबना करण्यात आली होती. ज्यामुळे भारतीय समुदायामध्ये संताप निर्माण झाला. सप्टेंबरमध्ये, BAPS स्वामीनारायण मंदिर, टोरंटोची कॅनडियन खलिस्तानी अतिरेक्यांनी विटंबना केली होती.
परराष्ट्र मंत्रालयाचे निवेदन: BAPS स्वामीनारायण संस्था ही एक आध्यात्मिक, स्वयंसेवक-चालित श्रद्धा आहे. जी श्रद्धा, एकता आणि निःस्वार्थ सेवेच्या हिंदू आदर्शांना प्रोत्साहन देऊन वैयक्तिक वाढीद्वारे समाज सुधारण्यासाठी समर्पित आहे. गेल्या सप्टेंबरमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि कॅनडातील भारतविरोधी कारवायांबद्दल तीव्र शब्दात चिंता व्यक्त करण्यात आली होती. सांख्यिकी कॅनडाने 2019 ते 2021 दरम्यान धर्म, लैंगिक अभिमुखता आणि वंशावर आधारित द्वेषपूर्ण गुन्ह्यांमध्ये 72 टक्के वाढ नोंदवली आहे. यामुळे अल्पसंख्याक समुदायांमध्ये, विशेषतः भारतीय समुदायामध्ये भीती वाढली आहे, जो कॅनडातील सर्वात वेगाने वाढणारा लोकसंख्याशास्त्रीय गट आहे. कॅनडात लोकसंख्येच्या जवळपास चार टक्के हिंदू आहेत.