तेहरान - कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी १९६२ नंतर पहिल्यांदाच इराणने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला मदत मागितली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
१९६२ नंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने इराणला एकदाही कर्ज दिले नाही. आमच्या केंद्रीय बँकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंटला मदत मागितली आहे. या विनंतीला जबाबदारीने स्वीकारण्याची मागणीही इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केली.
याआधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने असे जाहीर केले होते, की कोरोना विषाणूला लढा देण्यासाठी आपण रॅपिड फायनॅन्शिअस इन्स्ट्रुमेंटद्वारे मदत करणार आहोत. याद्वारे आम्हालाही मदत मिळावी, अशी विनंती आमच्या केंद्रीय बँकेने केली आहे, असे ट्विट झरीफ यांनी केले आहे.
मध्य-पूर्व आशियामध्ये या विषाणूचा सर्वाधिक फटका इराणला बसला आहे. देशाचे उपराष्ट्रपती आणि दोन कॅबिनेट मंत्र्यांनाही याचा संसर्ग झाला आहे. तसेच, इराणमध्ये या विषाणूचे ३५४ बळी गेले आहेत.
जगभरातील ११४ देशांमधील साधारणपणे सव्वा लाख लोकांना या विषाणूची लागण झाली आहे. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये याचा संसर्ग पसरण्याचे प्रमाण विलक्षणरित्या घटले असले, तरी इटली आणि इराणमध्ये मात्र दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत चालले आहे. मध्यपूर्व आशियामध्ये इराण वगळता इराक, इजिप्त आणि लेबानॉन या देशांमध्येही या विषाणूचे बळी आढळून आले आहेत.
हेही वाचा : भारतात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या 73 वर