अंकारा - भूमध्य सागरातील नैसर्गिक संपत्तीवरून तुर्कस्तान आणि ग्रीस या देशांमध्ये वाद सुरू आहेत. नुकतेच तुर्कस्तानने पूर्व भूमध्य समुद्रात तेल आणि वायूच्या शोधासाठी युद्धनौकेसह संशोधन नौका पाठविली होती. त्यानंतर दोन्ही देशांचे नौदल एकमेकांच्या आमनेसामने उभे ठाकले होते. दरम्यान, नैसर्गिक संपत्तीच्या वाटपावरून चर्चेचा प्रस्ताव तुर्कस्तानने मांडला आहे.
दोन्ही देशांतील तणावपूर्ण वातावरणानंतर लष्करी संघर्ष होण्याची शक्यता तुर्कस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली होती. ग्रीसने भूमध्य समुद्रात युरोपीयन संघाच्या मदतीनं आक्रमक धोरण स्वीकारल्याचा आरोप तुर्कस्तानचे परराष्ट्र मंत्री मेव्हलूट कॅव्युसोग्लु यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून दोन्ही देशांचे नौदल भूमध्य समुद्रात सतर्क असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
दोन्ही देशांतील राजकीय नेते एकमेकांविरुद्ध भडकाऊ भाषणे करत आहेत. भूमध्ये समुद्रात लष्करी सराव करत दोन्ही देशांनी शक्तीप्रदर्शनही केले आहे. भूमध्य समुद्रातील नैसर्गिक संपत्ती हा तुर्कस्तानचा न्याय हक्क असल्याचा दावा तुर्कस्तानचे पंतप्रधान रसेप तय्यीप एरदोगान यांनी केला आहे. तसेच त्यांनी लष्करी कारवाई करण्याची धमकीही ग्रीसला दिली आहे.