अंकारा : अमेरिका आणि चीननंतर स्वतःची कोरोना लस बनवणारा तिसरा देश टर्की आहे, असा दावा देशाचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्डोगन यांनी केला आहे.
टुबिटॅक (द सायंटिफिक अँड टेक्नॉलॉजिकल रिसर्च काऊंसिल ऑफ टर्की) हे सध्या आठ प्रकारच्या विविध लसींवर काम करत आहे. तर दहा विविध वैद्यकीय प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. टर्कीच्या उत्तर-पश्चिम भागातील प्रांत कोकॅलीमधील ट्युबिटॅकच्या केंद्राच्या उद्घाटनावेळी एर्डोगन यांनी ही माहिती दिली.
कोरोनाविरुद्धची लस बनवण्यामध्ये टर्की उल्लेखनीय प्रगती करत असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. आठपैकी दोन लसींची प्राण्यांवरील चाचणी ही यशस्वी झाली आहे, तसेच एका लसीच्या मानवी चाचणीसाठी परवानगीही मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
टर्कीमध्ये सध्या कोरोनाचे २ लाख ३९ हजार ६२२ रुग्ण आढळले असून, आतापर्यंत ५ हजार ८२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.