कीव - रशियाने युक्रेनविरोधात युद्ध ( Russia-Ukraine War ) पुकारलं आहे. आज युद्धाचा 16 वा ( Russia-Ukraine War 16th day ) दिवस आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनमधून दोन लाखांहून अधिक लोकांना देश सोडून पळून जाण्यास भाग पाडले आहे. सामान्य लोक अजूनही युक्रेनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करत आहेत. वीज, अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा युक्रेनमध्ये झाला आहे. तुर्कस्तानमध्ये रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर काही चांगली बातमी येईल, अशी लोकांना आशा होती. परंतु तसे झाले नाही आणि चर्चा व्यर्थ ठरली.
मारियुपोलच्या महत्त्वपूर्ण दक्षिणेकडील बंदरात बुधवारी झालेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांमध्ये एका मुलाचा समावेश आहे. या घटनेत 17 जण जखमी झाले आहेत. बुधवारी मारियुपोलच्या बंदर शहरातील प्रसूती रुग्णालयावर रशियन हवाई हल्ल्यात एका मुलासह तीन लोक ठार झाले. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी गुरुवारी पोलंडच्या भेटीदरम्यान रशियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. रशिया-युक्रेन युद्धाचा फटका प्रत्येक देशाला बसत आहे. भारत शांततेच्या बाजूने आहे आणि सर्व समस्या चर्चेतून सुटतील अशी आशा आहे, असे ते म्हणाले.
अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे तेल आणि नैसर्गिक वायूच्या किमती गगनाला भिडत आहेत. भारत सरकारही तेल आणि वायूची बिले कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. मात्र, या आपत्तीच्या काळात पंतप्रधान मोदींनी गव्हाच्या निर्यातदारांना खास आवाहन केले आहे. गहू निर्यातदारांनी युक्रेन संकटाच्या काळात, त्या देशांना गहू निर्यात करण्याचा विचार करा, जे आतापर्यंत युक्रेन आणि रशियाकडून ते विकत घेत आहेत, असे मोदी म्हणाले.
भारतीय विद्यार्थ्यांवर परिणाम -
रशिया आणि युक्रेन युद्धाचा भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम झाला आहे. यांच्यात सुरू असलेल्या युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला. तर आणखी एक विद्यार्थी कीवमध्ये गोळीबारात जखमी झाला होता. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी सरकारने ऑपरेशन गंगा हे मिशिन राबवले आहे. याअंतर्गत हजारो विद्यार्थी भारतात आले आहेत.
रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर -
युक्रेनविरोधात रशियाने पुकारलेल्या युद्धाला खुद्द रशियामधील नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. रशियातील नागरिक पुतीनविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी युक्रेन विरोधातीलयुद्ध बंद करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी रस्त्यावर येत निर्देशने केल्याने रशियातील हजारो नागरिकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रशियामध्ये सोशल मीडियावर देखील बंदी घालण्यात आली आहे. रशियामध्ये फेसबूक बंद करण्यात आले आहे.
युक्रेनचे महत्त्व -
युक्रेन हा भारतासारखाच बहुभाषिक देश असून रशिया आणि युक्रेनियन लोकांचा वंश एकच म्हणजे स्लॉव्ह आहे. मात्र, या देशाचे दोन ठळक भाग आहेत. पश्चिमेकडील भागावर युरोपचा मोठा प्रभाव आहे. तर पूर्वेकडील भागावर रशियाचा प्रभाव आहे. युक्रेन हा युरोप आणि रशिया यांच्या दरम्यान असल्याने दोन्ही तो आपल्या प्रभावाखाली असावा, असे युरोपीय देश आणि रशिया या दोघांनाही वाटते. आर्थिक कारणांबरोबरच सामरिक कारणही तितकेच महत्त्वाचे आहे. आता पुतीन यांनी युद्ध पुकारल्याने हे युरोपातील 1945 नंतरचं सगळ्यात मोठं युद्ध असेल. केवळ युक्रेनची नव्हे तर रशियाचीही या युद्धात मोठी जीवितहानी होत आहे.
हेही वाचा - Aditya Thackeray : ही तर सुरुवात! बाहेर राज्यात निवडणुका लढण्यावर आम्ही ठाम -आदित्य ठाकरे