मक्का - इस्लामिक सहकार संस्थेने (ओ.आय.सी) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेली शांतता योजना फेटाळली आहे. पॅलेस्टाईन सरकारने केलेल्या विनंतीनुसार, ५७ सदस्यीय समितीने सोमवारी बैठक घेतली होती. यामध्ये ट्रम्प यांच्या शांतता योजनेवर चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला.
याआधी अरब लीगनेही ट्रम्प यांची ही योजना फेटाळली होती. पॅलेस्टाईनच्या नागरिकांचे किमान अधिकार आणि आकांक्षा ही योजना पूर्ण करत नाही, असे म्हणत ही योजना फेटाळण्यात आली होती. त्यानंतर आता 'ओआयसी'नेही या 'शतकातील सर्वात महान' योजनेकडे पाठ फिरवली आहे.
साधारणपणे तीन वर्षे अभ्यास करून तयार केल्या गेलेल्या या योजनेमध्ये जेरूसलेमला इस्त्रायलची 'अविभाजित' राजधानी घोषित करण्याची तरतूद आहे. जेणेकरून, इतिहासातील सर्वात जास्तवेळ चाललेल्या वादांपैकी एक असलेल्या पॅलेस्टाईन-इस्त्राईल वादावर द्विराज्यीय उपाय दाखवता येईल.
ओआयसीने रविवारी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले होते, की अमेरिकन प्रशासनाने शांतता योजना जाहीर केल्यावर परराष्ट्र मंत्र्यांच्या पातळीवरील "ओपन-एन्ड कार्यकारी समितीची बैठक" यावर चर्चा करेल. दरम्यान, या बैठकीपासून इराणच्या प्रतिनिधींना दूर ठेवण्यात आले होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री होसेन जाबरी यांच्या नेतृत्वात इराणी प्रतिनिधीमंडळाला व्हिसा नाकारण्यात आला. ज्यामुळे, इराणचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
हेही वाचा : टेक्सास विद्यापीठात बेछूट गोळीबार.. 2 ठार, 1 जखमी