एशकोल - इस्त्राईलवर ५ क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती इस्त्राईल सैन्याने दिली आहे. हे रॉकेट गाझा पट्टीतून डागण्यात आल्याचे वृत्त आहे, असे टाईम्स ऑफ इस्त्राईल या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. आज (रविवार) पहाटे हा रॉकेटहल्ला करण्यात आला.
लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात कोणी जखमी किंवा कोणत्याही प्रकारची हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. गाझाच्या दक्षिण भागाला लागून असलेल्या एशकोल क्षेत्रातून रविवारी पहाटे १२ वाजून ४० मिनिटांना हे रॉकेट डागण्यात आले, अशी माहिती इस्त्राईलच्या सुरक्षा यंत्रणेने दिली आहे.
इस्त्राईलच्या तेलअव्हीव शहराच्या उत्तरेकडील नागरीवस्तीवर गेल्या सोमवारी (२५ मार्च) रॉकेट हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन या दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. सोमवारी रॉकेट हल्ला झालेले ठिकाण गाझापट्टीपासून ८० किमी अंतरावर होते. इस्त्राईल येथे येत्या ९ एप्रिलला सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे ही पार्श्वभूमी लक्षात घेता या हल्ल्यांची गंभीर दखल इस्त्राईल घेत जोरदार प्रत्युत्तर देणार अशी शक्यता आहे.