बीजींग - चीन, रशिया आणि इराण या तीन देशांचा संयुक्त नौदल सराव हा २७ ते ३० डिसेंबरदरम्यान होणार आहे. ओमानच्या आखातात हा सराव होणार असल्याची माहिती चीनच्या एका प्रवक्त्याने गुरुवारी दिली.
चीनच्या नौदलाकडून या सरावासाठी 'शिनिंग' हे क्षेपणास्त्र नाशक पाठवण्यात येणार असल्याची माहिती वु क्वियान या राष्ट्रीय संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. या तीन देशांच्या नौदलांमधील देवाणघेवाण आणि सहकार्य वाढावे या उद्देशाने या सरावाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, आपापल्या नौदलाची क्षमता दाखवणे, आणि एकमेकांप्रती सद्भावना वाढवून विश्वशांतीसाठी एकत्रितरित्या प्रयत्न करणे यासाठी हा सराव घेण्यात येणार आहे, असे वु यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, की हा सराव हा इतर सर्व लष्करी सरावांसारखाच आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि पद्धतींनुसार याचे आयोजन करण्यात आले असून, प्रादेशिक परिस्थितीशी याचा काहीही संबंध नाही. तसेच, चीन आणि टांझानिया या दोन देशांमधील संयुक्त लष्करी सराव हा जानेवारी २०२०च्या मध्यापर्यंत आयोजित केला जाऊ शकतो अशी माहिती वु यांनी दिली.
हेही वाचा : अवकाशावर वर्चस्व गाजवण्यासाठी अमेरिकेची 'स्पेस फोर्स'; चीनचा जळफळाट