काबुल : अफगाणिस्तानच्या दक्षिणेकडे असलेल्या हेलमंड प्रांतात झालेल्या एका हल्ल्यात सुमारे २३ नागरिक ठार झाले. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता. प्रांत गव्हर्नर कार्यालयाने याबाबत माहिती दिली. हा बॉम्ब एका चारचाकीमध्ये लावण्यात आला होता, तसेच यावेळी मॉर्टर हल्लाही झाला.
दरम्यान, तालिबान आणि अफगाण सैन्य या हल्ल्याबाबत एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत. तालिबान म्हणत आहे, की अफगाण सैन्याने बाजारामध्ये मॉर्टर हल्ला केला होता. तर, लष्कराचे असे म्हणणे आहे की तालिबाननेच बाजारातील चारचाकीमध्ये बॉम्ब बसवला होता, आणि नागरिकांवर मॉर्टर हल्ला केला.
सैन्याने यावर स्पष्टीकरण देत असे म्हटले आहे, की सोमवारी त्या भागामध्ये कोणतीही लष्करी कारवाई होत नव्हती. तसेच या कारमधील बॉम्ब फुटला तेव्हा त्यात दोन तालिबान्यांचाही खात्मा झाला, जे कदाचित ती कार घेऊन आले होते.
दरम्यान, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तालिबानने केलेल्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानचे २९१ सैनिक ठार झाल्याची माहिती तेथील सरकारने दिली आहे. यासोबतच, सुमारे ५५० सैनिक यात जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. २००१मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका आठवड्याच्या कालावधीमध्ये अफगाणिस्तानचे एवढे सैनिक मारले गेले आहेत.
हेही वाचा : अफगाणिस्तान सैन्याच्या एअरस्ट्राईकमध्ये २५ तालिबानींचा खात्मा!