काबुल : अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांतामध्ये केलेल्या एका एअरस्ट्राईकमध्ये २५ तालिबान्यांचा खात्मा झाल्याची माहिती मिळाली आहे. बुधवारी रात्री बल्खमधील दौलत अबादमध्ये हा हल्ला करण्यात आला. बल्खच्या राज्यपालांचे प्रवक्ते मुनीर अहमद फर्हाद यांनी याबाबत माहिती दिल्याचे एका स्थानिक वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात चार नागरिकही ठार झाले. यामध्ये एका महिलेसह एका लहान मुलाचाही समावेश होता. मात्र, ही बाब फर्हाद आणि अफगाण लष्कराने फेटाळून लावली आहे. तर, तालिबानकडून याबाबत कोणतीही माहिती वा प्रतिक्रिया आलेली नाही.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात तालिबानने केलेल्या हल्ल्यांमध्ये अफगाणिस्तानचे २९१ सैनिक ठार झाल्याची माहिती तेथील सरकारने दिली आहे. यासोबतच, सुमारे ५५० सैनिक यात जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. २००१मध्ये अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर पहिल्यांदाच एका आठवड्याच्या कालावधीमध्ये अफगाणिस्तानचे एवढे सैनिक मारले गेले आहेत.
हेही वाचा : VIDEO : रशियाच्या रेड स्क्वेअरवर दिमाखात पार पडली 'व्हिक्टरी परेड'..