रियाध : सौदी अरेबियाच्या वारसा प्राधिकरणाच्या वैज्ञानिक पथकाने चक्क अश्मयुगातील अवजारांचा शोध लावला आहे. ही अवजारे तब्बल दोन लाख वर्षांपूर्वीची असल्याचे समोर आले आहे. वारसा प्राधिकारणाने आपल्या प्रेस रिलीजमध्ये याबाबतची माहिती दिली. सौदी अरेबियामधील शुऐब-अल-अदघाम भागामध्ये ही अवजारे मिळाली आहेत.
त्या काळातील सर्वात प्रगत अवजारे..
मिळालेल्या माहितीनुसार, ही त्या काळातील सर्वात प्रगत अशी अवजारे आहेत. यामध्ये बहुतांश कुऱ्हाडींचा समावेश आहे. दैनंदिन शिकारीकरता या कुऱ्हाडींचा वापर केला जात असे. ही अवजारे असिरियन साम्राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे या भागात अश्मयुगात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. यासोबतच, अरबी द्विकल्पामध्ये त्याकाळी मानवी वस्तीसाठी सुयोग्य असे हवामान आणि नैसर्गिक साधनसंपत्ती उपलब्ध होती, असेही यामधून समजले आहे.
नदीकिनारी होत्या वसाहती..
वारसा प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट छायाचित्रांमधून हे दिसून येत आहे, की बहुतांश अवजारे नदीकिनारी आढळून आली आहेत. त्यामुळे, या काळातील लोक नदीकाठी वसाहती करत करत, पुढे अरेबियन द्विकल्पामध्ये पोहोचले असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
असेरियन साम्राज्याचा विस्तार पाहता, आणि आता समोर आलेल्या या अवजारांमुळे हे स्पष्ट होत आहे की या वसाहतींमधील लोक दूरचा प्रवास करत असत. जसजशी गरज पडेल तसतसे ते नव्या ठिकाणांचा शोध घेत, आणि त्या ठिकाणी रहायला चालू करत होते. अरबी द्विकल्पात राहणारे तत्कालीन लोक हे मोठे वाळवंट पार करुन दूरपर्यंत प्रवास करत असल्याचेही यातून समोर आले आहे.
तत्कालीन हवामानाचीही माहिती..
या दगडी अवजारांमुळे तत्कालीन हवामानाचाही अंदाज लावता येणे शक्य झाले आहे. या काळात अरबी द्विकल्पातील हवामान हे कोरडे आणि जास्त प्रमाणात दमट असल्याचे या दगडांवरुन समजले आहे. यामुळे अरबी द्विकल्पात या काळात पाण्याचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्याच्या अंदाजाला अधिक पुष्टी मिळाली आहे. तसेच, अरेबियन कथांमध्ये ज्या 'नैसर्गिकदृष्ट्या सधन' अशा अरबी द्विकल्पाचा उल्लेख आढळतो, त्यालाही यामधून अधिक बळकटी मिळाली आहे.
हेही वाचा : कोरोना नियमावलीचे पालन करत केरळमध्ये शाळा सुरू