लंडन - इंग्लंडमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पंतप्रधान आणि हुजूर पक्षाचे नेते बोरिस जॉन्सन आणि त्यांचे विरोधक मजूर पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बाइन यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. गुरुवारी सकाळी ७ वाजता निवडणुकीला सुरुवात होईल. रात्री १० वाजेपर्यंत मतदान सुरू राहील.
ब्रिटनमध्ये ३ वर्षांपासून ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. या स्थितीत काहीही सुधारणा नसताना नागरिकांना तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे निवडणुकांबाबत विशेष उत्साहाचे वातावरण नसल्याचे चित्र आहे. या निवडणुकीतून ६५० जागांवरून लढणाऱ्या ३,३२२ उमेदवारांचे भविष्य आज निश्चित होणार आहे.
दरम्यान, आपण कोणत्याही परिस्थितीत जानेवारी २०२० पर्यंत ब्रेग्झिट घडवून आणू असा दावा जॉन्सन यांनी केला आहे. तर आपण या मुद्दय़ावर पुन्हा जनमत घेऊ असे आश्वासन कॉर्बाइन यांनी दिले आहे.
पार्श्वभूमी :
माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी २०१६ मध्ये ब्रेग्झिटच्या मुद्दय़ावर जनमत घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो फसल्यानंतर त्यांना पायउतार व्हावे लागले. नंतर त्यांच्याच पक्षाच्या थेरेसा मे पंतप्रधान बनल्या. त्यांच्याकडून ब्रेग्झिट करार मंजूर होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते आणि सध्याचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीच तो उधळून लावला. त्यामुळे ब्रिटिश संसदेत थेरेसा यांना तीनदा पराभूत व्हावे लागले. अखेर त्यांना राजीनामा देणे भाग पडले.
माजी पंतप्रधान थेरेसा यांच्या राजीनाम्यानंतर बोरिस जॉन्सन पंतप्रधान झाले. ३१ ऑक्टोबपर्यंत आपण ब्रेग्झिट करवून दाखवू असा त्यांचा दावा होता. तो त्यांच्या अन्य अनेक विधानांप्रमाणे पोकळ निघाला. त्यामुळे अखेर त्यांनाही निवडणुकांना सामोरे जाण्यात वेळ आली. सध्या ते निवडणुकीला उभे राहिले असले तरी, ते फारसे लोकप्रिय नाहीत. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी जेरेमी कॉर्बाइन यांचीही प्रतिमा फारशी चांगली नाही. ब्रिटनच्या नागरिकांना या दोघांपैकी एकाची निवड करावयाची आहे.