स्टॉकहोम - निसर्गातील क्लिष्ट भौतिकीय शक्तींचे वर्णन आणि भाकित वर्तविण्यासाठी मौल्यवान संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ त्रयीला यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानी शास्त्रज्ञ स्युकुरो मनाबे, जर्मन शास्त्रज्ञ क्लाऊस हसेलमॅन आणि इटलीचे शास्त्रज्ञ जिओर्जिओ पॅरिसी या तिघांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल विभागून मिळणार आहे.
- ग्लोबल वॉर्मिंगच्या बदलांचे परिमाण मोजण्यावर केले आहे संशोधन -
मनाबे आणि हसेलमॅन यांनी पृथ्वीच्या वातावरणाच्या भौतिकीय संरचनेविषयीचे संशोधन केले आहे. ग्लोबल वॉर्मिंगविषयी आडाखे बांधणे आणि बदलांचे परिमाण मोजण्यावर हे आधारित आहे. या दोघांना अर्धा पुरस्कार विभागून मिळणार आहे.
- पृथ्वीच्या पृष्ठभागातील तापमान कसे वाढते त्याचे केले संशोधन -
वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या पातळीमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागातील तापमान कसे वाढते हे दाखवणारे संशोधन मानबे यांनी केले आहे. त्यांना या मॉडेलसाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. 'त्यांच्या या कार्याने सध्याच्या हवामान मॉडेलच्या विकासाचा पाया घातला आहे.' असे नोबेल पुरस्काराबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
- अणूच्या भौतिकीय प्रणालीबाबत महत्वाचे संशोधन -
तर पॅरिसी यांनी अणू ते ग्रहीय प्रमाणादरम्यान भौतिकीय प्रणालीतील विस्कळीतपणा आणि चढउतारातील परस्परक्रियेविषयीचे संशोधन केले आहे. पॅरिसी यांना अर्धा पुरस्कार मिळणार आहे.
- तिघांचेही क्लिष्ट प्रणालीवर संशोधन -
या तिघांचेही संशोधन क्लिष्ट प्रणाली म्हणून ओळखले जाते. वातावरण हे त्याचे केवळ एक उदाहरण आहे.
- १९०१ मध्ये पहिला पुरस्कार -
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. १९०१ मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.
- 'असे' आहे पुरस्काराचे स्वरूप -
पुरस्कार स्वरुपात दोघांना सुवर्णपदक, पदवी आणि एक कोटी स्वीडिश क्रोनोर म्हणजेच सुमारे साडेआठ कोटी रुपयांची रक्कम मिळणार आहेत. डायनामाईटचा शोध लावणारे स्वीडिश शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथी दिवशी (१० डिसेंबर) स्टॉकहोममध्ये पाच विषयांतील नोबेल पारितोषिकांचे वितरण केले जाते. त्याच दिवशी नॉर्वेमध्ये सहाव्या शांततेच्या नोबेल पारितोषिकाचे वितरण केले जाते. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात येते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडतो.
हेही वाचा - डेव्हिड जुलियस, अर्डेम पॅटपौटीयन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल