लंडन : कोविड-१९ रुग्णांच्या जगण्याची शक्यता वाढवणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा लंडनच्या संशोधकांनी दावा केला आहे. 'डेक्सामेथासॉन' हे स्टेरॉईड कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे पुराव्यानिशी दाखवून दिल्याचे या संशोधकांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे हे स्टेरॉईड स्वस्त आणि जगभरात सगळीकडे सहजरीत्या उपलब्ध होईल असे आहे.
याविषयी झालेल्या संशोधनाचे निष्कर्ष मंगळवारी समोर आले, लवकरच ते प्रसिद्धही केले जातील, असे या संशोधकांनी सांगितले. यामध्ये त्यांनी २,१०४ रुग्णांची निवड करुन त्यांना हे औषध वापरण्यास सांगितले होते. तर ४,३२१ रुग्णांवर नेहमीप्रमाणे उपचार सुरू ठेवले होते. २८ दिवसांनंतर असे समोर आले, की या औषधामुळे ज्यांच्यावर श्वसनयंत्राच्या मदतीने उपचार केले जात होते, अशा रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता ३५ टक्क्यांनी घटली, तर ज्यांना केवळ काही प्रमाणात ऑक्सिजन पुरवठ्याची गरज होती, अशा रुग्णांमध्ये मृत्यूची शक्यता २० टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. त्याहून कमी आजारी असलेल्या रुग्णांवर मात्र याचा तितकासा परिणाम दिसून आला नाही.
या संशोधकांपैकी एक असलेल्या पीटर हॉर्बी यांनी म्हटले, की हा अत्यंत महत्त्वाचा शोध आहे. यामुळे जगभरातील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी करता येईल. त्यामुळे डेक्सामेथासॉनला आता कोरोना उपचारासाठी जगभरात मान्यता दिली गेली पाहिजे. कारण, डेक्सामेथासॉन हे स्वस्त आणि सहजरित्या उपलब्ध आहे.
हे केवळ गंभीर रुग्णांवरच उपयोगी ठरत असले, तरी यामुळे असंख्य प्राण आपण वाचवू शकतो असे 'वेल्लकम' संस्थेचे निक कम्मॅक यांनी म्हटले आहे. ही संस्था वैज्ञानिक संशोधनांना मदत पुरवते. हे औषध आता सर्वांनी सर्वांसाठी उपलब्ध करुन दिले पाहिजे, असेही निक म्हणाले.