लियोन (फ्रान्स) - एका चर्चबाहेर शनिवारी ग्रीक ऑर्थोडॉक्स धर्मगुरुंवर समाजकंटकाने गोळी झाडल्याची घटना घडली. या हल्ल्यात धर्मगुरू गंभीररीत्या जखमी झाले असून हल्लेखोराचा शोध सुरू आहे.
एका हल्लेखोराने रायफलमधून धर्मगुरुंवर गोळी झाडली. ही गोळी धर्मगुरूंच्या पोटात लागली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
परिसर सील
पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला असून नागरिकांना घटनास्थळी न जाण्याचा इशारा ट्विटरवरून देण्यात आला आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तीन दिवसांतील दुसरी घटना
दोन दिवसांपूर्वी इस्लामिक दहशतवाद्याने निस शहरातील एका चर्चवर चाकूहल्ला केला होता. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ शनिवारी धर्मगुरुंवर हल्ला करण्यात आला.
वादग्रस्त व्यंगचित्र
पॅरिस शहराच्या उत्तर भागातील एका शाळेत भूगोल विषयाच्या शिक्षकाने वर्गात शिकवताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीने त्या शिक्षकाचा शिरच्छेद केला. पोलिसांच्या कारवाईत या हल्लेखोराचाही मृत्यू झाला होता. सुमारे १५ दिवसांपूर्वी ही घटना घडली होती.
हेही वाचा- 'लव जिहाद'वरून योगींचा इशारा '..तर राम नाम सत्यचा प्रवास सुरू होईल'
हेही वाचा- बिहार निवडणुकीतील प्रचार कसा बदलतोय; पाकिस्तान, पुलवामा घटनांच्या चर्चेचे कारण काय?