स्टॉकहोम - माध्यम स्वातंत्र्यासाठी निडरपणे आवाज बुलंद करणारे फिलिपिन्स आणि रशियातील दोन सुप्रसिद्ध पत्रकार यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. फिलिपिन्समधील पत्रकार मारिया रेसा आणि रशियन पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांना संयुक्तपणे यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार विभागून मिळणार आहे.
जाणून घ्या, पत्रकार मारिया रेसा यांचे कार्य -
फिलिपिन्समध्ये सत्तेच्या गैरवापरातून होत असलेल्या हिंसाचाराच्या विरोधात मारिया रेसा यांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठविला आणि देशातील वाढती हुकूमशाही उघड करण्याचा प्रयत्न केला. 2012 मध्ये रेसा यांनी रॅपलर या डिजिटल मीडिया कंपनीची सह-स्थापना केली. त्या अजूनही याच्या प्रमुख आहेत. एक पत्रकार आणि रॅपलरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, रेसा यांनी नेहमीची अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या निर्भय रक्षक असल्याचे आपल्या कामातून दाखून दिले. त्यांनी रॅपलरच्या माध्यमातून डुटेर्टे राजवटीच्या वादग्रस्त, खुनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेवर गंभीरपणे लक्ष दिले होते. त्यांनी सोशल मीडियाचा वापर कश्याप्रकारे दहशत पसरवण्यासाठी केला जातो याचे दस्तऐवजीकरण देखील केले आहे.
जाणून घ्या, पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांच्याविषयी -
दिमित्री आंद्रेयेविच मुरातोव्ह यांनी अनेक दशकांपासून रशियातील वाढत्या आव्हानात्मक परिस्थितीत भाषण स्वातंत्र्याच्या रक्षणाचे काम केले. 1993 मध्ये ते नोव्हाजा गॅझेटा या स्वतंत्र वृत्तपत्राच्या संस्थापकांपैकी एक होते. 1995 पासून ते एकूण 24 वर्षे वृत्तपत्राचे मुख्य संपादक होते. नोव्हाजा गॅझेटा हे आज रशियामधील सर्वाधिक स्वतंत्र वृत्तपत्र म्हणून ओळखले जाते. ज्यात सत्तेबद्दल मूलभूतपणे गंभीर दृष्टिकोन आहे. वृत्तपत्राची वस्तुस्थितीवर आधारित पत्रकारिता आणि व्यावसायिक सचोटी यामुळे रशियन समाजाच्या निंदनीय बाबींवर माहितीचा एक महत्त्वाचा स्त्रोत हे वृत्तपत्र बनले आहे. ज्याचा इतर माध्यमांनी क्वचितच उल्लेख केला आहे. 1993 मध्ये सुरू झाल्यापासून नोव्हाजा गॅझेटा या वृत्तपत्रातून भ्रष्टाचार, पोलीस हिंसा, बेकायदेशीर अटक, निवडणूक-फसवणूक आणि "ट्रोल फॅक्टरी" पासून रशियाच्या आत आणि बाहेर रशियन सैन्य दलांच्या वापरापर्यंतच्या विषयांवर गंभीर लेख प्रकाशित केले आहेत. ज्यामुळे अनेकदा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. त्यांना वृत्तपत्रांचे स्वतंत्र धोरण सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रासही देण्यात आला. मात्र त्यांनी या सर्व गोष्टींना न जुमानता आपले काम अविरतपणे चालु ठेवले आणि सातत्याने पत्रकारांच्या हक्कांचे रक्षण केले.
2020चे शांततेचे नोबेल -
गेल्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषिक जागतिक अन्न कार्यक्रमाला (World Food Programme) जाहीर झाले होते. 'जागतिक अन्न कार्यक्रम' ही संस्था संयुक्त राष्ट्राच्या अतंर्गत काम करते. भूकेवरुद्ध डब्ल्यूएफपीने सुरु केलेल्या लढाईसाठी, तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये शांततेसाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना आणि भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात केलेल्या कामासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर 2019 शांततेचे नोबेल पारितोषिक हे इथियोपियाचे पंतप्रधान अहमद अली यांना देण्यात आले होते. अहमद अली यांनी शेजारील राष्ट्र असलेल्या एरिट्रियाबरोबरचा सीमावाद सोडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. दोन्ही देशांमध्ये शांती नांदण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.
यंदा कुणा-कुणाला मिळाले नोबेल -
- शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र
4 ऑक्टोंबर रोजी नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. मानवी शरीराला तापमान आणि स्पर्शाची जाणीव करून देणाऱ्या चेतातंतूचा शोध लावणाऱ्या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. डेव्हिड जुलियस आणि अर्डेम पॅटपौटीयन अशी या दोन शास्त्रज्ञांची नावे आहेत. नोबेल पारितोषिक दोन्ही शास्त्रज्ञांना संयुक्तपणे देण्यात आला आहे. - भौतिकशास्त्रासाठी
6 ऑक्टोबरला भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर झाले. निसर्गातील क्लिष्ट भौतिकीय शक्तींचे वर्णन आणि भाकित वर्तविण्यासाठी मौल्यवान संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ त्रयीला यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. जपानी शास्त्रज्ञ स्युकुरो मनाबे, जर्मन शास्त्रज्ञ क्लाऊस हसेलमॅन आणि इटलीचे शास्त्रज्ञ जिओर्जिओ पॅरिसी या तिघांना यंदाचा भौतिकशास्त्रातील नोबेल विभागून मिळणार आहे. - रसायनशास्त्र
2021चे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक डॉ. बेंजामिन लिस्ट आणि डॉ. डेव्हिड मॅकमिलन यांना देण्यात आले आहे. त्यांनी नवे रेणू तयार करण्यासाठी ‘सेंद्रिय उत्प्रेरणा’चे (ऑरगॅनोकॅटालिसिस) तंत्र विकसित केले आहे. - साहित्य
यावर्षीचे साहित्यातील नोबेल पारितोषिक कादंबरीकार अब्दुलरझाक गुर्नाह यांना प्रदान करण्यात आले आहे. अब्दुलरझाक गुर्नाह यांनी आतापर्यंत दहा कादंबऱ्या आणि अनेक लघुकथा प्रकाशित केल्या आहेत. ‘पॅराडाइज’ आणि ‘डेझर्शन’ या कादंबऱ्या लक्षणीय आहेत. अब्दुलरझाक गुर्नाह यांचा जन्म झांझीबार बेटावर 1948 मध्ये झाला. सध्या ते इंग्लंडमध्ये वास्तव्याला आहेत. 1960 च्या उत्तरार्धात शरणार्थी म्हणून इंग्लंडमध्ये आले होते. निर्वासितांच्या समस्या त्यांच्या लेखनाचा प्रमुख विषय आहे.
तर अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा सोमवारी करण्यात येणार आहे.
नोबेलविषयी...
नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.
दरवर्षी ऑक्टोबरमध्ये नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा करण्यात येते. त्यानंतर डिसेंबरमध्ये पारितोषिक वितरण सोहळा पार पडतो. यावर्षीही पारितोषिक विजेत्यांची घोषणा नेहमीप्रमाणे होणार असली, तरी पुरस्कार वितरण सोहळा मात्र कशा प्रकारे आयोजित केला जाईल, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
हेही वाचा - क्लिष्ट भौतिकीय प्रणालीविषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञ त्रयीला भौतिकशास्त्रातील नोबेल