लंडन - कोरोनाची लागण झाल्यामुळे इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन रुग्णालयामध्ये उपचार घेत होते. मात्र, त्यांची रुग्णालयातून सुटका झाल्याचे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. मात्र, डॉक्टांराच्या सल्ल्यानुसार जॉन्सन लगेच कामावर परतणार नाहीत.
जॉन्सन(55) लंडनमधील सेंट थॉमस रुग्णालयात 5 एप्रिलला भरती करण्यात आले होते. सुरवातीला त्यांनी घरातच स्वत:ला विलग करून घेतले होते. तसेच घरातून ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोरोनाच्या परिस्थितीवर नजर ठेवून होते. अनेक बैठकाही त्यांनी कोरोनाची लागण झाल्यानंतर घेतल्या. एखाद्या देशाच्या पंतप्रधानाला कोरोनाची लागण झाल्याचे पहिलेच उदाहरण जॉन्सन होते.
घरातच डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, नंतर प्रकृती सतत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 6 तारखेला त्यांना अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले. तेथे 9 तारखेपर्यंत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मात्र, आता प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाचे 78 हजार 991 रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 875 जण दगावले आहेत. मागील दोन दिवसांपासून इंग्लमध्ये 900 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे देशापुढील चिंता वाढली आहे.