जिनेव्हा - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून सर्व देश या जागतिक आपत्तीविरोधात लढा देत आहेत. कोरोना महामारीच्या या काळात भारताने अनेक देशांना सहकार्य केले असून औषधांचा पूरवठा केला आहे. त्यावर संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी भारत सरकारचे कौतूक केले आहे.
आरोग्य जागतीक आपत्तीमध्ये सर्वांनी एकत्र येत कोरोनाविरोधात लढा देण्याची गरज आहे. या तत्वानुसार अनेक देशांनी इतर राष्ट्रांना मदत केली आहे. त्या सर्व देशांचे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी कौतूक केले असून त्यांच्या कार्याला सलाम केल्याचे प्रवक्ता स्टीफन दुजारिक यांनी सांगितले.
भारताने कोरोना संकटात सार्कच्या सदस्य देशांना मदत केली आहे. तसेच अमेरिका, ब्राझील आणि इस्त्राईलसह अनेक देशांमध्ये औषधे पाठविली. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी भारताने आपल्या लष्करी आरोग्य कर्मचाऱ्यांना कुवैत आणि मालदीव येथे पाठविले आहे. तसेच भारताने अफगाणिस्तानमध्ये अन्न टंचाई निर्माण होऊ नये म्हणून गव्हाची मदत केली आहे. त्यानंतर आता पुन्हा वैद्यकीय मदत देऊ केली आहे. मित्र देशांना शक्य तेवढी मदत करण्यात येईल, असे भारताने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर पुढाकार घेत सार्क देशांना कोरोनाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले होते. विषाणूविरोधात लढण्यासाठी जागतिक स्तरावर आपत्कालीन निधी उभारण्यासही भारताने पुढाकार घेतला होता.