बर्लिन - कोरोना संकटाचा सामना कसा करायचा? या काळजीतून जर्मनीच्या हेसी प्रांताच्या अर्थमंत्र्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अर्थमंत्र्याच्या आत्महत्येतून कोरोना उद्रेकाची दाहकता दिसून येत आहे. कोरोना प्रसारामुळे आर्थिक संकट कसे हाताळावे, या विवंचनेत ते होते. थॉमस शेफर (54) असे आत्महत्या केलेल्या मंत्र्याचे नाव आहे.
शेफर हे उद्योगधंद्याचे केंद्र असलेल्या हेसी राज्याचे अर्थमंत्री होते. शनिवारी रेल्वे ट्रॅकवर त्यांचा मृतदेह आढळून आला. आत्महत्या केल्याच्या वृत्ताला वेसबेडन शहरातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. शेफर यांनी आत्महत्या केल्यामुळे आम्हाला धक्का बसला असून दु: खी झालो आहोत, असे राज्याचे प्रमुख व्होलकर बाऊफेर यांनी सांगितले. हेसी राज्यामध्ये जर्मनीतील महत्त्वाचे आर्थिक शहर फ्रॅकफर्ट आहे. येथे अनेक आघाडीच्या बँका आणि व्यवसायांची प्रमुख कार्यालये आहेत.
मागील 10 वर्षांपासून ते हेसी राज्याचा आर्थिक कारभार सांभाळत होते. कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना ते दिवसरात्र करत होते. अनेक कंपन्या आणि उद्योगांना आर्थिक उभारी देण्याच प्रयत्न ते करत होते. मात्र, चिंतेत असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली. अडचणीच्या काळात गरज असताना ते आमच्यातून गेले, असे बाऊफेर म्हणाले.
जर्मनीमध्ये 58 हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 455 जणांचा मृत्यू झाला आहे. चीननंतर सर्वात जास्त कोरोनाचा प्रसार युरोपात झाला आहे. त्यामुळे सर्व युरोपीयन देशांमध्ये आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. आज दिवसभरात 552 कोरोना रुग्ण जर्मनीत आढळून आले आहेत.