पॅरिस : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून एक डिसेंबरपर्यंत हे लॉकडाऊन लागू असणार आहे. मात्र, या लॉकडाऊनदरम्यान शाळा सुरू राहणार असल्याचे राष्ट्राध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
मंगळवारी फ्रान्समध्ये कोरोनाच्या ५२०हून अधिक बळींची नोंद झाली. त्यानंतर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन हाच उपाय पुन्हा लागू करण्याचा विचार आम्ही केला. त्यानुसार, शुक्रवारपासून आपण देशात पुन्हा लॉकडाऊन लागू करत आहोत, असे मॅक्रॉन यांनी जनतेला दिलेल्या संदेशात म्हटले.
असे असणार लॉकडाऊन..
या लॉकडाऊनमध्ये फ्रान्समधील सर्व रेस्टॉरंट, बार आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंद राहणार आहेत. तसेच, जास्तीत जास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन मॅक्रॉन यांनी केले आहे. तसेच, शेतीची कामे, कंपन्या आणि बांधकामे सुरू राहू शकतात असेही त्यांनी सांगितले आहे.
यापूर्वीच्या लॉकडाऊनप्रमाणे हे लॉकडाऊन नसणार आहे. नर्सिंग होम आणि स्मशानभूमी खुल्या असणार आहेत. याबाबतची संपूर्ण नियमावली सरकार लवकरच जाहीर करणार आहे.
फ्रान्सला कोरोनाचा तडाखा..
देशातील निम्म्याहून अधिक रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग हे कोरोनाच्या रुग्णांनी भरले आहेत. फ्रान्सचे हवाई दल आणि खासगी विमानेही कोरोना रुग्णांना उपचारांसाठी विविध ठिकाणी घेऊन जाण्यासाठी मदत करत आहेत.
स्पेनमध्येही दुसरी लाट, आणीबाणी घोषित..
कोरोना विषाणूचा देशातील वाढता प्रसार पाहता स्पेन सरकारने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. यासोबतच, देशात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असेल, अशी माहिती पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी दिली.
हेही वाचा : मातृभूमीच्या रक्षणासाठी अर्मेनियन पंतप्रधानांच्या पत्नी जाणार सीमेवर!