पॅरिस : फ्रान्सचे पंतप्रधान इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी झालेल्या 'इस्लामिस्ट दहशतवादी हल्ल्याचा' निषेध व्यक्त केला. यासोबतच त्यांनी दहशतवादाला तोंड देण्यासाठी नवी रणनीती आखण्याची शपथ घेतली.
"उद्या (शुक्रवारी) संरक्षण विभागाची एक बैठक पार पडेल, ज्यामध्ये दहशतवादाला तोंड देण्यासाठीच्या नव्या रणनीतीबाबत पावले उचलली जातील" अशी घोषणा मॅक्रॉन यांनी केली. ते नीसमध्ये बोलत होते. यासोबतच, देशभरातील आंदोलनांच्या ठिकाणी आणि प्रार्थनास्थळांजवळ मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मोदींनीही नोंदवला निषेध..
पंतप्रधान मोदींनीही फ्रान्समधील दहशतवादी हल्ल्यांचा निषेध केला. हल्ल्यातील पीडित नागरिक आणि फ्रान्सच्या जनतेसोबत आमच्या भावना आहेत. तसेच, दहशतवादाविरोधातील लढ्यात आम्ही फ्रान्सबरोबर उभे आहोत, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले.
दहशतवादी चाकू हल्ला..
फ्रान्समध्ये गुरुवारी झालेल्या चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला, तसेच जण जखमी झाले. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. यापूर्वी एका शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर आता पुन्हा चाकू हल्ल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद..
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लिम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला होता. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅकरॉन यांनी या घटनेचा कठोर शब्दात निषेध केला होता. यावेळी मुस्लिम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर जगभरातील मुस्लीम समुदायाकडून टीका होत आहे. अनेक इस्लामिक देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाली.
हेही वाचा : 'लाखो फ्रेंच नागरिकांना मारण्याचा मुस्लिमांना अधिकार' व्यंगचित्र वाद पेटला