नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपुढे देशातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे हतबल झाली आहे. यातच कित्येक देश भारताच्या मदतीला धावून येत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेनंतर आता फ्रान्सनेही भारतासाठी मदत पाठवली आहे. यामध्ये उच्च क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर्स, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, २८ व्हेंटिलेटर्स आणि आयसीयूमधील उपकरणांचा समावेश आहे.
पुढील काही दिवसांमध्ये हे साहित्य भारतात दाखल होईल. यात आठ उच्च प्रतीच्या ऑक्सिजन तयार करणाऱ्या मशीन्सचा समावेश आहे. या मशीन्स प्रत्येकी २५० बेड्ससाठी वर्षभर पुरेल इतका ऑक्सिजन तयार करु शकतात. तसेच, २००० रुग्णांना पाच दिवस पुरेल एवढा लिक्विड मेडिकल ऑक्सिजनही फ्रान्स पाठवणार आहे. फ्रान्सचे राजदूत इमॅन्युएल लेनियन यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सुरू केलेल्या सहकार्य अभियानाअंतर्गत आम्ही भारताला मदत करत आहोत. ही मदत नक्कीच देशातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपयोगी ठरेल, असेही लेनियन यांनी म्हटले.
हेही वाचा : भारतातील कोरोनास्थिती गंभीर; पाकिस्तानने पुढे केला मदतीचा हात